स्मार्ट सिटीत अखेर पणजीचा समावेश
By admin | Published: May 25, 2016 02:46 AM2016-05-25T02:46:59+5:302016-05-25T02:50:44+5:30
पणजी : स्मार्ट सिटीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत गोव्याची राजधानी पणजी शहराचा समावेश झालेला असून एकूण १७७५ कोटी रुपये खर्चाच्या
पणजी : स्मार्ट सिटीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत गोव्याची राजधानी पणजी शहराचा समावेश झालेला असून एकूण १७७५ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मार्ट सिटीसाठी पाच वर्षांत ५३४ कोटी रुपये तसेच केंद्राची अमृत योजना आणि अन्य मिळून १७७५ कोटी रुपयांची कामे शहरात होतील. यात नागरी बस वाहतूक सेवेचाही समावेश आहे. ‘हॉप आॅन हॉप आॅफ’ अर्थात शहरात कुठेही बसमध्ये चढून कुठेही उतरता येईल. त्यासाठी चार वेगवेगळे मार्ग निश्चित केले जातील.
मंगळवारी सकाळी केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी दिल्लीत १३ स्मार्ट शहरांची नावे जाहीर केल्यानंतर दुपारी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली. दुसऱ्या यादीत पणजी आठव्या स्थानावर आहे. १३ शहरांची यादी जाहीर झाली, त्यात लखनौ पहिल्या स्थानी आहे. पणजीत पॅन सिटी आणि विभागनिहाय अशा दोन वर्गवाऱ्यांमध्ये ही विकासकामे होणार आहेत. ‘हॉप आॅन हॉप आॅफ’ पद्धतीवर शहरात नागरी बससेवेसाठी चार मार्ग निश्चित केले जाणार आहेत. १८ जून रस्ता व शहरातील अंतर्गत परिसर, ताळगाव-सांतइनेज, कदंब बसस्थानक ते दोनापावल, बांबोळी असे हे मार्ग असतील.
घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वीज, रस्ते आदी मूलभूत सुविधा, चर्च स्क्वेअर परिसराचा कायापालट, रुअ द औरे खाडीचा विकास, मलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा, मळा तलावाचे पुनरुज्जीवन, एकात्मिक शहर जल व्यवस्थापन, मळा येथील वारसास्थळातील सेवा सुधारणा आदी कामांचा यात समावेश असेल.
(प्रतिनिधी)