पणजी : गोवा शालान्त मंडळाने यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज न छापण्याचा निर्णय घेतला असून हे अर्ज केवळ आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. बारावी आणि दहावीच्या आॅक्टोबरमधील परीक्षांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण झाली असून या परीक्षांसाठीचे सर्व अर्ज हे आॅनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात आले होते, अशी माहिती शालान्त मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी दिली. परीक्षेच्या अर्जांचे नमुने छापणे मंडळाने या परीक्षेपासून बंद केले असून यापुढे अर्जांची छपाई करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याची सुरुवात बारावीच्या निकालानंतर एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांपासून करण्यात आली होती. त्या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज पाठविण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली होती; परंतु गोंधळ होऊ नये यासाठी त्या वेळी छापील अर्जही विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले होते. एक प्रयोग म्हणून हा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्याची आता पूर्ण अंमलबजावणी करण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. आॅक्टोबरच्या परीक्षेसाठी करण्यात आलेली अंमलबजावणी यशस्वी ठरली असल्याची माहिती शेट्ये यांनी दिली. पूर्णपणे आॅनलाईन अर्ज पद्धती लागू करणारे गोवा शालान्त मंडळ हे देशातले पाचवे मंडळ असल्याची माहिती शेट्ये यांनी दिली. (प्रतिनिधी)
दहावी-बारावी परीक्षेचे अर्ज आॅनलाईन
By admin | Updated: August 27, 2014 01:31 IST