लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : मागील चाळीस वर्षे आम्ही मराठीसाठी लढा देत आहोत. राष्ट्रपतींपर्यंत निवेदने देऊन झालीत. आता लढाई आरपारची करायची आहे. यापुढे संख्या बोलेल, असे वातावरण निर्माण करूया. मराठी व्होटबँक (मतपेटी) निर्माण करून राजकर्त्यांवर दबाव आणूया. तुम्ही ज्या पक्षाचे कार्यकर्ते असाल त्या पक्षाला ठणकावून सांगा, जो पक्ष मराठीचा उद्धार करेल, त्यालाच तुमचे मत मिळेल, असे आवाहन सुभाष वेलिंगकर यांनी केले.
मराठी राजभाषा समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या फोंडा प्रखंड मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर, शाणूदास सावंत, गोविंद देव, दिवाकर शिक्रे, जयंत मिरींगकर, शशांक उपाध्ये, पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, उदय डांगी, विद्या नाईक, दिव्यामावजेकर उपस्थित होते.
वेलिंगकर पुढे म्हणाले की, आमच्या आंदोलनाला नवी धार द्यावी लागेल. यापुढे तालुका समिती स्थापन करून चळवळ व्यापक करण्यात येईल. ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करूया. जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार करताना युवाशक्ती व नारी शक्ती संघटित करूया. मराठीची अवहेलना करणारा पक्ष सत्तेवर राहणार नाही, हा निर्धार करूया. राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी आमच्याकडे फक्त दोन वर्षे आहेत. ऐन निवडणुकीच्या वेळी राजकर्त्यांना खिंडीत पकडण्याचे काम करूया. यावेळी बोलताना गो. रा. ढवळीकर म्हणाले, की मराठी भाषेची प्रगती होत आहे म्हणूनच राज्यात मराठी वर्तमानपत्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
वाचनालयामधून मराठी पुस्तके अधिक वाचली जात आहेत. यावरून मराठी हीच गोव्याची राजभाषा व्हायला हवी हे सिद्ध होते. आज तरुणांची दिशाभूल करण्याचे प्रकार होत आहेत. तरुणांना भाषेसंबंधी वस्तूस्थिती समजावून सांगायला हवी. आज गोव्यात ड्रग्ज, कॅसिनो, अनाचार वाढत चालला आहे. हे सर्व मराठी भाषा डावलली गेल्यामुळे होत आहे. कारण मराठीमुळे इथली संस्कृती टिकून होती. संस्कृतीचा -हास झाल्यास भावी पिढी बरबाद होईल. एकेकाळी गोव्याला दक्षिण काशी म्हटले जायचे. आज परिस्थिती बदलत चालली आहे. म्हणूनच भावी पिढी सुसंस्कृत राहावी, म्हणून हा आमचा लढा चालू आहे. आज जे लोक कोंकणीचा उदो उदो करत आहेत व मराठीचा द्वेष करत आहे, त्यांच्याच पूर्वजांनी अनेक वर्षांपूर्वी मराठीत उच्च दर्जाचे साहित्य निर्माण करून ठेवले आहे.
मराठी शाळा बंदीचा संस्कृतीवर परिणाम
वेलिंगकर पुढे म्हणाले की, राजकारण्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच मराठीचा -हास होत आहेत. परिणामी मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. याचा थेट परिणाम संस्कृतीवर होत आहे. पिग, पेग, व प्रॉस ही संस्कृती गोव्यात उदयास येत आहे. हे सर्व अडवायचे असल्यास मराठी भाषेशिवाय पर्याय नाही.
पं. नेहरू जबाबदार?
आजच्या मराठीच्या हासाला तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व तत्कालीन केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यांनीच कोंकणी संस्कृती, कोंकणी भाषेला संरक्षण देऊ असे जाहीर केले होते. कोंकणी भाषेला साहित्य अकादमीची मान्यता मिळाली, हाही सर्वात मोठा घोटाळा आहे, असे गो. रा. ढवळीकर यावेळी बोलताना म्हणाले. जयंत मिरींगकर यांनी प्रास्ताविक केले.