मडगाव : केवळ थापा मारून लोकांना उल्लू बनविणाऱ्या भाजपला लोक विटले आहेत. गोमंतकीय जनता नवीन पर्यायाकडे आशेने पाहते आहे. अशा स्थितीत फातोर्डात जो ‘फातोर्डा फॉरवर्ड’ हा फॉर्म्युला यशस्वी झाला, तोच फॉर्म्युला आता संपूर्ण गोव्यात राबविण्यासाठी ‘गोवा फॉरवर्ड’ ही मोहीम हाती घेणार असल्याची घोषणा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. फातोर्डा फॉरवर्ड पॅनलव्दारे आपण नवीन चेहरे लोकांसमोर आणले आणि फातोर्डातील लोकांनी या फॉर्म्युलाला उदंड प्रतिसाद दिला. फातोर्डातील ११ पैकी ११ उमेदवार या फॉर्म्युल्यामुळे जिंकले. आता हाच फॉर्म्युला संपूर्ण गोव्यात चालविण्यासाठी समविचारी राजकीय नेते आणि सामाजिक नेत्यांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. गोव्यातून या फॉर्म्युल्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. फातोर्डातील जनतेने व एकंदरच गोव्याच्या मतदारांनी पालिका निवडणुकीत जो कौल दिला आहे, त्याचा भाजप सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि जनतेचा हा कौल मानून घेताना कुठल्याही पालिकेत घोडेबाजाराला ऊत आणून त्या पालिकेत अस्थिरता आणू नये, असे आवाहन त्यांनी केले. फातोर्डा फॉरवर्ड व मॉडेल मडगाव यांनी एकत्र येऊन ‘मडगाव सिव्हीक अलायन्स’ या नावाखाली आघाडी स्थापून जे नगरसेवक निवडून आणले, त्यांच्याकडून स्थिर प्रशासन दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मडगावातील नगरमंडळ कार्यक्षमरीत्या चालावे यासाठी सर्व नागरिकांच्या सूचनांचा आदर केला जाईल. मग त्या भाजपकडून का येईनात. सर्व सूचना अमलात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी शहरातील आदरणीय व्यक्तींची एक देखरेख समितीही नेमली जाईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आता ‘गोवा फॉरवर्ड’ मोहीम...
By admin | Updated: October 29, 2015 02:01 IST