पणजी : उत्तर गोव्यातील पश्चिम घाट क्षेत्रात आणि पाली, अंजुणे या सत्तरी तालुक्यांमधील भागांत पट्टेरी वाघाचा संचार असल्याची कबुली सरकारतर्फे गुरुवारी प्रथमच देण्यात आली. वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या अतारांकित प्रश्नावर ही माहिती दिली. राज्यातील जंगलांमध्ये पट्टेरी वाघ दिसला आहे ही गोष्ट खरी आहे का, अशी विचारणा रेजिनाल्ड यांनी केली होती. त्यावर मंत्री साल्ढाणा यांनी उत्तर गोव्याच्या काही भागांत अशा वाघांचा संचार असल्याचे सांगितले. सर्र्वप्रथम १८ एप्रिल २०१३ रोजी वाघाला कॅमेऱ्यामध्ये टिपले. त्यानंतर म्हादई अभयारण्य क्षेत्राच्या डोंगुर्ली परिसरात गावकऱ्यांना पट्टेरी वाघ दिसला. नंतर उत्तर गोव्यातील पाली व अंजुणे येथे वन्यप्राणी गणना करताना पट्टेरी वाघाची विष्ठा सापडली, असे मंत्री साल्ढाणा यांनी सांगितले. पट्टेरी वाघ दिसला तो भाग वाघांसाठी आरक्षित भाग म्हणून जाहीर करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत का, अशी विचारणा रेजिनाल्ड यांनी केली, त्यावर अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे मंत्री साल्ढाणा यांनी स्पष्ट केले. (खास प्रतिनिधी)
उत्तर गोव्यात पट्टेरी वाघांचा संचार!
By admin | Updated: July 25, 2014 01:51 IST