मडगाव : लुईस बर्जर प्रकरणात अडकलेले माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मिळालेल्या अटकपूर्व जामिनाला क्राईम ब्रँचने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले असतानाच या प्रकरणातील अन्य एक लाभार्थी असल्याचा दावा क्राईम ब्रँचकडून केला जात असलेले मडगावचे उद्योजक नितीन नायक यांनी त्या काळात ज्यांच्याशी पैशांचे व्यवहार केले होते, त्यासंबंधीचा तपशील क्राईम ब्रँचने शुक्रवारी आपल्या ताब्यात घेतला. बर्जर लाच प्रकरणाच्यावेळी नितीन नायक यांनी ज्या कुणाशी आर्थिक व्यवहार केले होते, त्यांचे तपशील क्राईम ब्रँचचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी मडगावातील बँकांकडून शुक्रवारी घेतले. संपूर्ण दिवसभर ते मडगावातील विविध बँकांत फिरत असल्याचे दिसून येत होते. मिळालेल्या माहितीप्रमाणे, या कालावधीत नायक यांनी मोठ्या रकमेचे व्यवहार रोखीने केले असून त्यात ४0 लाखांपासून दोन कोटींपर्यंतचे व्यवहार रोखीने झाल्याचे या तपशिलातून उघड झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. क्राईम ब्रँचच्या दाव्याप्रमाणे कामत यांनी जी लाच स्वीकारली होती, त्याची रक्कम नितीन नायक यांच्या खात्यात वळवली आहे. यासाठी यापूर्वी त्यांच्या कार्यालयावर व घरावर क्राईम ब्रँचने छापाही टाकला होता. (प्रतिनिधी)
नितीन नायक यांच्या बँक व्यवहाराची कागदपत्रे जप्त
By admin | Updated: October 10, 2015 01:08 IST