पणजी : ई-मेल हॅक करून बँकांना फसवून कोट्यवधी रुपये लुटण्याच्या प्रकरणात नायजेरियन हॅकर्सचा हात असल्याचे सायबर गुन्हा विभागाच्या तपासातून उघड झाले आहे. गोवा सायबर विभागाने अटक केलेल्या दिल्ली पोलिसाला या हॅकर्सनी १० टक्के दलाली तत्त्वावर वापरल्याचेही उघड झाले आहे. बोगस ई-मेल पाठवून म्हापसा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेमधून एका खातेदाराच्या खात्यातून ३५ लाख रुपये या गँगने उचलले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नवी दिल्ली येथील नीरज कुमार याच्या कोठडीतील चौकशीदरम्यान ही गोष्ट उघडकीस आली आहे. दिल्ली पोलीस खात्यात सेवेला असलेल्या नीरज कुमार याच्या नावाने विविध बँकांत ३० खाती खोलण्यात आली होती. सर्व खात्यांत मिळून २ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. हे सर्व पैसे आॅनलाईन फसवणूक करूनच ट्रान्सफर करण्यात आले होते. ही सर्व खाती गोठविण्यात आली असल्याची माहिती सायबर गुन्हा विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दिली. (प्रतिनिधी)
आनलाईन फसवणुकीमागे नायजेरियन हॅकर्स
By admin | Updated: November 5, 2014 02:19 IST