पणजी : गोव्यात लग्न समारंभासाठी आलेल्या केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांना दाबोळी विमानतळावरून दक्षिण गोव्यातील पंचतारांकित हॉटेलपर्यंत पोहोचिवण्यासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर दिमतीला दिल्याप्रकरणी येथील समाजकार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. १५ दिवसांत कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला. जेठली यांची पत्नी संगीता, कन्या सोनाली २३ डिसेंबर रोजी विमानाने दाबोळीला आल्यानंतर तेथून त्यांना काणकोणमधील हॉटेलात पोहोचविण्यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरचा गैरवापर केल्याचे आयरिश यांनी तक्रारीत म्हटले आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी मोदी यांनी हस्तक्षेप करून चौकशीचा आदेश द्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी, तसेच जेटली यांच्याकडून हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्च वसूल करावा, अशी मागणी केली आहे. जेटली यांनी या प्रकाराबद्दल जनतेची जाहीर माफी मागावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अरुण जेटली कुटुंबीयांच्या दिमतीला नौदलाचे हेलिकॉप्टर
By admin | Updated: December 26, 2014 02:10 IST