पणजी : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोकणी लेखक एन. शिवदास यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार केंद्र सरकारला परत करण्याचा निर्णय रविवारी (दि.११) जाहीर केला. रामनाथी-फोंडा येथे सनातनविरोधी सभेत त्यांनी असे सुतोवाचही केले होते. देशातील वाढती असहिष्णुता आणि तीव्र हिंदुत्ववादासमोर नरेंद्र मोदी सरकारने टाकलेल्या नांगीच्या निषेधार्थ हा निर्णय घेतल्याचे शिवदास यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गोव्यातील बहुतांश साहित्यिक पुरस्कार परत करण्याचा निर्णय उद्या होणाऱ्या बैठकीत घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास देशातील हे आगळे-वेगळे उदाहरण ठरेल. रामनाथी येथील सभेत देशात आणीबाणीसारखी स्थिती असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते. ‘लोकमत’ला त्यांनी सांगितले की, देशातील सचोटीचे लेखक आजच्या स्थितीत स्वस्थ बसू शकत नाहीत. त्यामुळे मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय कुटुंबीय आणि मित्रमंडळींशी चर्चा करून घेतलेला आहे. सोमवारी (दि.१२) सायं. ४ वाजता हा निर्णय मी जाहीर करेन. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील अन्य साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांशी एन. शिवदास यांनी संपर्क साधला असून, साहित्यिक संयुक्तपणे कृती करण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)
एन. शिवदासही पुरस्कार परत करणार
By admin | Updated: October 12, 2015 02:00 IST