लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : दक्षिण गोवाकाँग्रेस जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी 'आप'चे बाणावली मतदारसंघाचे आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांच्या इंडी आघाडीवरच्या वक्तव्याचा समाचार घेतला. इतर पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टिप्पणी करू नये आणि सल्लेही देऊ नयेत, असा इशारा दिला.
यापुढे गोवा प्रदेश काँग्रेस पक्ष हा जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्व जागी आपले उमेदवार उभे करील. तसेच चाळीसही मतदारसंघात काँग्रेस पक्ष बळकट करील, अशी माहिती त्यांनी दिली. दक्षिण गोवा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. बाणावलीच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्यावर ताशेरे ओढले. 'काँग्रेस पक्ष हा देशात गेली १५० वर्षांहून अधिक काळ राजकारण आहे. अनेक लोक या पक्षाकडे निष्ठावान आहेत. आम्ही यापुढे राज्यातील चाळीसही मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निवडणुकीसाठी उभे करणार असून, काँग्रेस पक्ष बळकट करण्याचे काम आम्ही पक्षाचे नेते अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.'
डिसिल्वा पुढे म्हणाले, 'इंडी आघाडीबाबतचा निर्णय हे गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाचे नेते घेतील आणि यावेळी कुठलेही 'हाय कमांड' यात दखल देणार नाही. काही महिन्यांपूर्वी इंडी आघाडीतील काही नेते दक्षिण गोव्यातील एका मतदारसंघात जाऊन लोकांना भेटले. असे केल्याने काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही; पण काही नवीन पक्ष हे काँग्रेस पक्षाला वजा करण्यासाठीच आले असल्याचे लक्षात येत आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर टिप्पणी किंवा सल्ले दुसऱ्या पक्षाच्या आमदारांनी देऊ नये, तर स्वतःच्या पक्षाचा विचार करावा,' असा सल्ला डिसिल्वा यांनी दिला.