लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांचा मॉफिंग केलेला अश्लील व्हिडीओ बनविणाऱ्या कुकेश राऊता (२५, रा. ओडिशा) याला अटक करून पोलिसांनी जेरबंद केले असतानाही त्याने बनविलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ माजली आहे. कुकेश तुरुंगात असताना 'व्हायरल कांड' कोणी केले? याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे आमदार फेरेर हे कुकेशला सहा वर्षांपासून ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे भाजपने या प्रकरणावर 'स्कॅण्डल'चा संशय व्यक्त करत आमदारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आपला फोटो मॉर्फ करून त्याचा अश्लील व्हिडीओ बनविल्याची तक्रार आ. फेरेरा यांनी सायबर पोलिसांत केली होती. संशयित आपल्याकडे पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करीत असल्याचेही आमदाराने म्हटले होते. पैसे न दिल्यास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही कुकेशने दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी कुकेशला अटक केली. त्याला अटक केल्यानंतरही व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हा व्हिडीओ 'एक्स'वर व्हायरल झाला आहे. त्यानंतर तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील प्रमुख संशयित कुकेश राऊता याचे आमदार फेरेरा यांच्याशी ६ वर्षांपासून चांगले संबंध होते. कुकेश गोव्यातच राहत होता आणि २०१८ पूर्वीपासून तो आपणाला ओळखत होता, असे खुद्द आमदारांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. कुकेशला आपण खूप सहकार्य केले. वेळोवेळी त्याला गरज भासली तेव्हा पैसेही दिले होते. तो वेळेवर पैसेही परत करत होता. परंतु अचानक २०२३ मध्ये दिवाळीच्या दिवसात त्याने आपल्याला एक व्हिडीओ पाठविला जो अश्लील होता. मॉफिंग करून महिला आपल्यासोबत दाखविण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
कार्लुस ठरले व्हिक्टीम
दरम्यान पोलिसांकडे नोंद झालेल्या एफआयआरमध्ये आमदार कार्ल्स यांचे नाव आहे. कार्ल्स हे सेक्सटोर्शनचे व्हिक्टीम आहेत. एक व्हिक्टीम या नात्याने त्यांचे नाव एफआयआरमध्ये आले आहे. कार्ल्स अजून मीडियाकडे या विषयावर काही बोललेले नाहीत.
सकाळी अर्ज घेतला मागे, सायंकाळी पुन्हा जामीन अर्ज सादर
या प्रकरणातील संशयित कुकेश राऊता काल सकाळी पणजी प्रथमश्रेणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. नंतर मात्र त्याने आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर काल सायंकाळी पुन्हा कुकेश याने जामीन मिळवण्यासाठी म्हापसा न्यायालयात धाव घेतली आहे.
५ लाख ते ५ कोटी
संशयिताने व्हिडीओ ५ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजेच १ वर्षापूर्वी बनविला होता. व्हिडीओ बनविल्यानंतर फेरेरा यांना पाठवून दिला होता. तसेच सुरुवातीला ५० हजार रुपये मागितले. त्यानंतर वर्षभर तो पैसे उकळतच होता. एकूण ५ लाख रुपये त्याने आमदाराकडून उकळले होते. त्यानंतर त्याची आशा आणखी वाढली आणि थेट ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळे आमदाराने पोलिसात तक्रार केली.
सत्य समोर आणा...
आमदारांनी आपल्या पदाचा अगोदर राजीनामा द्यावा. जर हा व्हिडीओ मॉर्फ होता तर आमदाराने त्याला पैसे दिलेच कसे? त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी हळदोणेचे माजी आमदार ग्लेन टिकलो यांनी केली आहे. या प्रकरणात नेमके कोण दोषी आहे हे सत्य जनतेसमोर यायला हवे, असेही टिकलो म्हणाले.
मॉर्फ की स्कॅण्डल?
व्हायरल झालेला व्हिडीओ खरोखरच मॉफिंग केलेला आहे की, हे सेक्स स्कॅण्ड लआहे याचे त्या आमदारानेच स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी केली आहे. वेर्णेकर यांनी सोशल मीडियावरच या बातमीचा फोटो शेअर करताना हे सेक्सटॉर्शन आहे की सेक्स स्कॅण्ड लआहे?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
गुन्हा नोंदविण्यास एक वर्ष का लागले?
वास्तविक मॉर्फ केलेला व्हिडीओ फेरेरा यांना कुकेशने ५ डिसेंबर २०२३ मध्ये पाठवून पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तेव्हाच आमदाराने पोलिसात तक्रार नोंदविली होती. परंतु गुन्हा आता नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंदविण्यासाठी पोलिसांनी एक वर्ष का घेतले? तशी गोपनीयता राखणे तपासाच्या दृष्टीने आवश्यक होते का? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र सध्या संशयित ताब्यात असून पोलिस अधिक माहिती मिळवत आहेत.