लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य सरकार लवकरच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने गोव्यात दुग्धपेढी स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. इंडियन ऑइल सामाजिक दायित्व योजना व आरोग्यमच्यावतीने आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
देशात अन्यत्र आयओसीच्या संयुक्त विद्यमाने अशा प्रकारची दुग्धपेढी उभारण्यात आलेली आहे. गोव्यात दूध संकलनासाठी बराच वाव आहे. त्या अनुषंगाने सरकार प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग बेंदुर्डे-पोळे चौपदरीकरणासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी १,३७६ कोटी रुपये मंजूर केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, पर्यटन व वाहतूक क्षेत्रासाठी ही फार मोठी उपलब्धी ठरणार आहे. काणकोण बगल मार्ग रखडला होता. २२ किलोमीटरचा हा पट्टा चौपदरीकरण झाल्यानंतर वाहतुकीच्या दृष्टीने मोठा फायदेशीर ठरेल.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात रस्ते, पूल आदी पायाभूत सुविधांसाठी डबल इंजिन सरकारने निधीच्या बाबतीत कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. वरील चौपदरीकरणामुळे मडगाव काणकोण-कारवार कनेक्टिव्हिटी वाढेल आणि त्याचा फायदा राज्याला आर्थिकदृष्ट्याही होणार आहे.