पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे विदेश दौऱ्यावरून आल्यानंतर काही मंत्र्यांच्या प्रगतीचा आढावा घेतील व महिनाअखेरीस मंत्रिमंडळाची फेररचना केली जाईल, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून प्राप्त झाली. विदेश दौऱ्यावरून मुख्यमंत्री येत्या ९ रोजी परतणार आहेत. त्यानंतर काही हालचाली सुरू होतील. दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. काही पदांवर आयएएस अधिकारी नियुक्त केले. आता काही मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा मुख्यमंत्री घेतील व त्यानंतर मंत्रिमंडळाची दि. २४ सप्टेंबरपर्यंत फेररचना केली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा भाजपच्या काही आमदारांतही सुरू झाली आहे. वीजमंत्री मिलिंद नाईक यांना मंत्रिमंडळातून वगळून त्याजागी गोवा विकास पक्षाचे आमदार मिकी पाशेको यांना स्थान दिले जाईल, असे काही आमदारांना वाटते. पुढील विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसविरुद्ध सासष्टी तालुक्यात लढायचे असेल, तर पाशेको हे मदतरूप ठरतील, असे भाजपमधील काही धुरिणांना वाटते. आमदार बेंजामिन सिल्वा किंवा मंत्री आवेर्तीन फुर्तादो यांच्यापेक्षा पाशेको हे सासष्टीत वजनदार असल्याचे भाजपला वाटते. त्यातूनच त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विषय पुढे आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पाशेको यांनी भाजपला मदत करताना चर्च संस्थेलाही आव्हान देण्याची भाषा केली होती. दरम्यान, आपण चतुर्थीचा उत्सव पार पडल्यानंतर सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करीन, असे तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. पर्रीकर हे आॅस्ट्रियामध्ये खासगी दौऱ्यावर गेले आहेत. ते परतल्यानंतर पुढील हालचाली होणे अपेक्षित आहे. (खास प्रतिनिधी)
मंत्रिमंडळ फेररचनेत मिकींना स्थान?
By admin | Updated: September 6, 2014 01:25 IST