पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी मी नेहमीच गोव्याचे हित पाहिले. माझ्याच प्रयत्नांमुळे म्हादईचा विषय पाणी तंटा लवादासमोर पोहोचला. मला म्हादईप्रश्नी गोव्याच्या हिताची पूर्ण काळजी आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी सांगितले. दिल्लीहून या प्रतिनिधीशी बोलताना पर्रीकर म्हणाले की, म्हादई पाणी तंट्याच्या विषयावर गोवा व कर्नाटकमध्ये सध्या जी कायद्याची लढाई चालू आहे, ती लढाई लवादासमोर मीच नेली होती; कारण मला म्हादईच्या पाण्यावर गोव्याचे हित कसे अवलंबून आहे, ते ठाऊक आहे. मला गोव्याच्या हिताची काळजी आहे. त्यामुळे कुणाच्या सल्ल्याचीही मला गरज नाही. दरम्यान, पर्रीकर यांनी पाणी तंटा प्रश्न चर्चेअंती लवादाबाहेरही सोडवता येईल, असे म्हटल्याचे काही ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. त्यावरून म्हादई बचाव अभियानाने पर्रीकर यांचा निषेध केला आहे. त्याविषयी बोलताना पर्रीकर म्हणाले की, आपण एवढेच म्हणालो होतो की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, तर माझ्यातर्फे जे साहाय्य होऊ शकेल, ते करीन. (खास प्रतिनिधी)
म्हादईप्रश्नी गोव्याचेच हित पाहीन!
By admin | Updated: January 9, 2016 02:32 IST