पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी कर्नाटकमध्ये कुणीच कसल्याच प्रकारची आगळीक करू नये. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी कर्नाटक सरकारने घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिले आहे. यापूर्वी हुबळी-कर्नाटकमध्ये गोव्याची कदंब बस जाळण्यात आली होती. कणकुंबी येथे कालवा फोडण्यासाठीही एकदा जमाव जमला होता. यापुढेही असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पार्सेकर यांनी सिद्धरामय्या यांना पत्र लिहून लवादाच्या सर्व सूचनांचे कर्नाटककडून पालन केले जावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पार्सेकर यांनी व्यक्त केली आहे. कालवे जिथे बंद करण्यात आले आहेत, ते उघडण्याचा प्रयत्न काही आंदोलक राजकीय वरदहस्ताने करू पाहत असल्याचे पार्सेकर यांनी पत्रात म्हटले आहे. लवादाच्या आदेशाविरुद्ध जाऊन कालवे फोडणे किंवा ते खुले करण्याचा प्रयत्न करणे हे पाणी तंटा लवादाचा अवमान करणारे ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. (खास प्रतिनिधी)
म्हादईप्रश्नी आगळीक नको! मुख्यमंत्र्यांचे कर्नाटकला पत्र
By admin | Updated: October 15, 2015 02:15 IST