विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: 'राजकीय क्षेत्रात वावरत असताना मनोहरभाई पर्रीकर हे माझे गुरू, त्यांनी राजकारण, समाजकारण व जनतेशी सतत जोडले जाण्यासाठी विशेष शिकवण मला दिली. पर्रीकरांनी मला राजकीय क्षेत्रातील धडे दिले,' असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले, तर 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासामध्ये मानवी मूल्ये सांभाळत जनतेच्या समृद्धीची शिकवण दिली. त्यांचेही स्थान माझ्यासाठी वंदनीय आहे,' असे ते म्हणाले.
गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने खास 'लोकमत'शी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'माझ्या जीवनात आई वडिलांनी दिलेले संस्कार, मानवी मूल्ये महत्त्वाची ठरली. त्यातून मी घडत गेलो. प्राथमिक स्तरावर शिक्षकांनी चांगले संस्कार दिले. म्हणून मी घडलो. सर्व क्षेत्रात गुरुजनांची उत्तम शिकवण मिळाली. आई वडिलांनी परोपकार शिकवला. दुसऱ्याचे भले करावेच, पण कधीच वाईट चिंतू नये, शक्य तेवढी मदत करणे व सतत नम्र राहण्याची शिकवण दिली. ते माझे पहिले गुरू. प्राथमिक स्तरापासून डॉक्टरकीचे शिक्षण घेईपर्यंत अनेकांनी मला विचार व संस्कार दिले. त्यामुळेच मी आज या स्थानावर पोहचू शकलो.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'आज शिक्षक हे समाजाच्या गुरुस्थानी आहेत. त्यांनी विद्यार्थी घडवताना संस्कार करण्यावर विशेष भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांची मानसिकता हेरून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजे. शिक्षकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच करिअर तंत्रज्ञान व आवडीचे शिक्षण देण्यासाठीची प्रेरणा यावर भर द्यावा. राज्यातील प्राथमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यास पालक, शिक्षक व समाजातील घटकांनी योगदान द्यायला हवे.'
मोबाइल हा गुरू मानू नका
मुख्यमंत्री म्हणाले की, 'विद्यार्थ्यांनी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आई-वडील, शिक्षकांचा आदर्श बाळगावा. मुलांनी मोबाइलला गुरू न मानता मोबाइलचा उपयोग शैक्षणिक व तांत्रिक क्षेत्राच्या बुद्धिमत्तेशी निगडीत कामासाठी करावा. मोबाइलमध्ये हरवलेल्या आजच्या युवा पिढीने त्याचा वापर सकारात्मक दृष्टिकोनातून करायला हवा. समाज सतत तुमच्या कृतीकडे लक्ष ठेवून असतो. तुमच्यावरील संस्कार वर्तनातून समजतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्या गुरुजनांचा आदर करा.'
पंतप्रधानांची प्रेरणा
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, जीवनात नैतिक मुल्यांचे पालन करण्याची शिकवण बालपणापासून नकळत गुरुजन देत असतात आणि त्यातूनच माणूस घडतो. मीही त्यातलाच एक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आमच्यासाठी गुरुस्थानी आहेत. देशाचा कायापालट करत प्रत्येक घरात समृद्धी यावी, यासाठी ते अविश्रांत कार्य करत आहेत. जागतिक पातळीवर भारताला वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी मोर्दीचे कार्य अविस्मरणीय आहे. त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही गोव्यात गेल्या काही वर्षांत मानवी विकासाला चालना देत आहोत.'