मडगाव : आबे द फारिया या महान मानसोपचार तज्ज्ञाचे माहिती नव्या पिढीला व्हावी, यासाठी गोव्यातील पाठ्यपुस्तकात त्यांच्याविषयीचा धडा देण्याबरोबरच त्यांच्या कांदोळीतील घराला संग्रहालयाचा दर्जा देण्यासाठी गोवा सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले. आबे द फारिया यांच्या २५८ व्या जयंतीनिमित्त शनिवारी मडगावच्या रवींद्र भवनात कार्यक्रम आयोजित केला होता. फारिया यांनी मूळ पोर्तुगीज भाषेत लिहिलेल्या व नंतर मनोहर पर्रीकर यांच्याकडून कोकणीत अनुवाद झालेल्या पुस्तकाचे शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण झाले. गोव्यातील भाषा धोरणाबद्दल पर्रीकर म्हणाले की, मातृभाषेतूनच शिक्षण घेतल्यास मुलांना आकलन चांगल्या प्रमाणात होऊ शकते. मात्र, काही पालकांना इंग्रजीचे आकर्षण वाटते. यावर उपाय म्हणजे मराठी व कोकणीचा दर्जा वाढवून जास्तीजास्त लोकांना या भाषेकडे आकर्षित करता येणे शक्य असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार उदय भेंब्रे, मुंबईतील ख्यातनाम मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरिष शेट्टी आदी उपस्थित होते.
फारियांवरील धडा अभ्यासक्रमात : पर्रीकर
By admin | Updated: June 1, 2014 01:49 IST