लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : शिरगाव येथे लईराई जत्रोत्सवादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने नेमलेल्या समितीने जो अहवाल सादर केला आहे, त्यात शिरगाव देवस्थान समितीने प्रशासनाला सहकार्य केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र, हा अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे, असा दावा देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी केला. हा अहवाल आम्हाला मान्य नाही. आम्ही प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य केले आहे आणि आम्ही दोषी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष गावकर म्हणाले की, 'राज्य सरकारकडून आम्हाला अजून या अहवालासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अहवाल आल्यानंतर आम्ही त्यावर आमची भूमिका स्पष्ट करू. यासंदर्भातील ज्या काही गोष्टी असतील, त्या सर्व महाजनांसमोर मांडून पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, सरकारच्या अहवालात जो ठपका ठेवला जात आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. दुर्घटनेला आम्ही जबाबदार नाही, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष गावकर यांसह देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.