लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : ६३ वर्षे कार्यरत असलेल्या गोमंतक गौड मराठा समाज संघटना व 'उटा' संघटनांवर सरकारने बंदी घालून आदिवासीचे खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्याचे उत्तर त्यांना मिळणार आहे. २०२७ पर्यंत आदिवासींना राजकीय आरक्षण न मिळाल्यास त्यानंतर आम्हाला कोणत्याच सरकारची गरज राहणार नाही, असा इशारा माजी मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी दिला.
श्रीस्थळ-काणकोण येथील जी. एम. सेलिब्रेशन सभागृहात आदिवासींच्या युनायटेड ट्रायबल असोसिएशन (गावडा, कुणबी, वेळीप) या नव्या संघटनेच्या शुभारंभी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री प्रकाश वेळीप, माजी सरपंच उमेश गावकर, मोलू वेळीप, नव्या संघटनेचे अध्यक्ष विश्वास गावडे, जिल्हा पंचायत सदस्य शोभना वेळीप, दुर्गादास गावडे व सतीश गावकर उपस्थित होते. नव्या संघटनेच्या बॅनरचे अनावरण गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आदिवासींना संपविण्याचे काम सध्या सुरू आहे. "उटा' ही संस्था आदिवासींच्या हक्कांसाठी लढते म्हणूनच या संस्थावर बंदी घातली आहे. बंदी घातली म्हणून आमचे कार्य थांबणार नाही. 'उटा'च्या वाटेला येणारेच उटून जातील, असा इशारा गावडे यांनी दिला. ज्या 'उटा'मुळेच ज्यांना ओळख मिळाली तेच आज या संघटनेशी संबंध नसल्याचे सांगतात हे कितपत योग्य आहे असे सांगून तवडकरांवर निशाणा साधला. आदिवासी जवळ जी शक्ती आहे ती इतर कोणाजवळ नसून जो आदिवासींवर अन्याय करेल तो अन्याय आम्ही सहन करणार नाही. आदिवासींच्या संघटनांवर बंदी घालण्यात आलेला तो काळा कुट्ट दिवस असून आता परिवर्तनाची गरज असल्याचे गावडे म्हणाले.
यावेळी मीना गावकर यांनी फुलझाडे भेट दिली. सुरुवातीला सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासींसाठी असलेल्या योजनांची माहिती पथनाट्यद्वारा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद गावकर यांनी केले तर आभार अर्जुन गावकर यांनी मानले. या सभेला उपस्थितामध्ये माजी आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नाडिस, कानकोण नगरपालिकेचे नगरसेवक शुभम कोमरपंत उपस्थित होते. 'उटा' संघटनेवर प्रेम असल्यानेच हजारो आदिवासी बांधव या सभेला एकत्र झाल्याचे दया गावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. या सभेला काणकोणसह राज्यभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे संघटनेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिली आहे.
पूर्वीचा उटा फोंड्यातून सुरू झाला होता. आता नवा उटा काणकोणातून सुरू झाला, असे प्रकाश वेळीप यांनी सांगितले. चार दिवसात एक हजार पेक्षा अधिक लोक या सभेला उपस्थित राहू शकल्याने त्यांनी दया ऊर्फ उमेश गावकर यांच्या कौशल्याबद्दल त्याचे कौतुक केले. आतापर्यंत आदिवासी ५० टक्केच मिळाले आहेत. आणखीन ५० टक्क्यांसाठी आम्हाला आवाज उठवायचा आहे. आदिवासी व्यक्ती पुढे जाईल या भीतीनेच आमच्यामध्ये फूट घालण्याचे काम सुरू आहे, असे दुर्गादास गावडे यांनी सांगितले. गोव्यात गुंडाराज चालले आहे काय? आदिवासींना गृहीत धरू नका. आदिवासीवर अन्याय कोण करतो व त्यांना प्रोत्साहन कोण देतो, त्याची गय केली जाणार नाही असे विश्वास गावडे यांनी इशारा दिला.
आयआयटीला विरोध
गोवा राखणाऱ्या आदिवासी संघटनांवरच सरकार बंदी घालते. मात्र न्यायालयात आम्हाला न्याय मिळणार. आदिवासींवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. कोडार येथे होणाऱ्या आयआयटीला विरोध आहे, तेथील आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघटना कार्य करणार आहे. रामा काणकोणकर यांच्या मारहाण प्रकरणाच्या खऱ्या मास्टरमाईंडला शोधून काढा, असेही गावडे म्हणाले.