लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'गोमंतकीयांनी कायम मला साथ दिली आहे. गोव्याचा विकास करताना जनतेचे सहकार्य व साथ लाभत आली आहे. तशीच साथ २०२५ सालीही लाभेल असा विश्वास आहेच. मी नव्या वर्षीही गोव्याला स्थिर आणि चांगले सरकार देईन', असा संकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी सर्व गोमंतकीयांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'लोकमत'ने त्यांना २०२५ सालासाठी तुमचा संकल्प काय? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, 'आतापर्यंत पाच वर्षांहून अधिक काळ गोव्याला आम्ही राजकीय स्थिरता दिली आहे. माझ्या नेतृत्वाखालील सरकारने गोव्यातील राजकीय स्थैर्य हे कायम ठेवले. स्थिर आणि चांगले शासन देण्याची प्रक्रिया मी २०२५ सालीही सुरूच ठेवीन.'
मुख्यमंत्री म्हणाले की, '२०२५ साली राज्याचे प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे हा माझा प्रमुख संकल्प आहे. जनसामान्यांचे प्रश्न यापुढे देखील जलदगतीने सोडविणे हाच माझा व माझ्या सरकारचा प्रयत्न राहील. राज्यातील बेरोजगारांना काम मिळावे म्हणून अधिक व्यापक व प्रभावी पाऊले २०२५ साली उचलली जातील. अधिक संख्येने रोजगार संधी निर्माण केल्या जातील. गोव्यात आम्ही अनेक पायाभूत साधनसुविधा निर्माण केल्या आहेत. राज्याच्या विकासाची प्रक्रिया कायम सुरू ठेवण्यासाठी लोकांचे सहकार्य असेच कायम राहो अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मी प्रत्येक गोंयकाराला नव्या वर्षासाठी शुभेच्छा देतो. आपण सर्वजण मिळून अधिक चांगला व अत्यंत आदर्श असा गोवा घडवूया' असे मुख्यमंत्री म्हणाले.