पणजी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून शनिवार, रविवारी जोरदार वाऱ्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळाची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. येथील हवामान वेधशाळेचे साहाय्यक शास्त्रज्ञ एन. हरिदास यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अरबी समुद्रात निर्माण झालेला हा कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकत असून गोव्याच्या किनारपट्टीपासून ४00 किलोमीटर अंतरावर आहे. येत्या २४ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून समुद्र खवळलेला असेल. कमी दाबाचा हा पट्टा जर किनारपट्टीच्या जवळ आला, तर वादळही येऊ शकते. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राज्यात काही भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी होईल. तसेच जोरदार वाराही वाहणार आहे. दरम्यान, वेगाने वायव्येकडे सरकणारा हा पट्टा अधिक गतिमान झाल्यास वादळ निर्माण होऊन आखाती किनाऱ्याला धडक देण्याची शक्यता आहे. त्याला चक्रीवादळाची गती मिळण्याचे संकेत तूर्त तरी दिसत नाहीत. (प्रतिनिधी)
मुसळधार पाऊस शक्य
By admin | Updated: October 10, 2015 01:08 IST