लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : स्वतःचा स्वार्थ, घराणेशाहीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वतःच्या लाभाकडे लक्ष दिले. मात्र, भाजप सरकारने सत्तेवर आल्यापासून लोकहितार्थ अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवल्या. विद्यमान युवा पिढीचे हित तसेच भविष्याचा विचार करून लवकरच हर घर नेटवर्क योजना सुरू केली जाणार, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
हळदोणा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ता मेळावा खोर्जुवे येथे झाला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. मागील १० वर्षे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाने सामान्य लोकांचे हित लक्षात घेऊन विकासावर भर दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार ग्लेन टिकलो, उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर, रुपेश कामत, मंडल अध्यक्ष रणजीत उसगांवकर, महानंद अस्नोडकर, जि.प. सदस्या मनीषा नाईक, दीक्षा कानोळकर व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत रणजित उसगावकर, आभार प्रदर्शन मनीषा नाईक यांनी केले. सागर मावळणकर यांनी सूत्रसंचालन केले.
घरे कायदेशीर करणार
राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर घरांच्या मुद्यांवर चर्चा होऊ लागली आहे. विरोधकांनी अशा घरावर कारवाई होईल, असा अपप्रचार केला आहे. मात्र, सरकार अशा घरांवर कारवाई न करता ती कायदेशीर करण्यासाठी नवा कायदा तयार करून योग्य पावले उचलणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले. यातील अनेक घरे ही कोमुनिदाद जागेतील, आल्वारा जागेतील बरीच जुनी आहेत. ही समस्या हळदोणा मतदारसंघातही असून त्यावरही तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
हळदोणा मतदारसंघातून भाजपला ५२ टक्के मताधिक्याचे लक्ष्य
दामू नाईक म्हणाले, भाजपचे डबल इंजिन सरकार अंत्योदय तत्त्वावर गरिबांचा विकास हाच उद्देश बाळगून कार्य करीत आहे. हीच विचारधारा घेऊन पक्षकार्य करीत असून भविष्यातही याच तत्त्वावर कार्य करणार असल्याचे सांगितले. हळदोण्यातून भाजपला ५२ टक्के मिळवून देत पुन्हा निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार यांनी विद्यमान आमदारावर त्यांच्याकडून लोकांची होणाऱ्या दिशाभूलवर प्रकाश टाकला. सरकारने मंजूर केलेल्या कामांचे ते स्वतः श्रेय लाटण्याचा तसेच सरकारवर टीका करण्याचे कार्य करीत असल्याचे सांगितले. मतदारसंघात झालेला विकास हा केवळ भाजपामुळेच झाल्याचेही ते म्हणाले. हळदोण्याचे आमदार कार्ल्स फेरेरा यांच्या टीका करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मतदारसंघातील विकासकामे आपण लोकांचे हित लक्षात घेऊन मंजूर करीत आहे. त्याचे श्रेय विरोधक घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.