लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ पर्यंत राज्यात 'हर घर फायबर' होईल, असे आयटीमंत्री रोहन खंवटे यांनी काल विधानसभेत जाहीर केले. तसेच ग्रामीण डिजिटल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही मंत्री खंवटे माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अनुदान मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले.
फोर-जी टॉवर बसवण्यासाठी आम्ही बीएसएनएलच्या मदतीने ६० ठिकाणे शोधली आहेत. गोव्याच्या ग्रामीण भागात सुमारे २४ फोर जी टॉवर आधीच बसवले गेले आहेत. गोव्यात ७५९ नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत आणि धोरणाच्या विविध योजनांअंतर्गत ४ कोटी रुपयांहून अधिक अनुदान वितरित करण्यात आले आहे.
गोव्याचे पहिले स्टार्टअप आणि आयटी धोरण दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली उद्योगातील भागधारकांच्या पाठिंब्याने सुरू करण्यात आले. गोवा ऑनलाइन पोर्टल आता ४१ सरकारी खात्यांच्या २४७ सेवा नागरिकांना देत आहे आणि या उपक्रमाला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, असेही खंवटे म्हणाले.
लवकरच ऑनलाइन ग्रंथालय सुरू केले जाईल. या ग्रंथालयात मुक्तिपूर्व पुस्तके असतील जी विद्यार्थी आणि संशोधकांसाठी उपयुक्त ठरतील. ते त्यांच्या प्रकल्पांसाठी आणि अभ्यासासाठी ती डाउनलोड करून वापरू शकतील. ऑनलाइन ई-राजपत्र सुरू केले आहे आणि कोंकणी आवृत्ती देखील आहे; लवकरच ई-प्रमाणित राजपत्र सुरू केले जाईल, ज्यामुळे डिजिटल प्रशासन आणखी मजबूत होईल.
पूर्वी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी पंचवीस दस्तऐवज लागायचे ते कमी करून ते आता तीन ते चार दस्तऐवज पुरेसे केले आहेत. पूर्वी ३,६०० हॉटेलची नोंदणी होती. ही संख्या आता २०२३ वर पोचली आहे. तीन वर्षांत ५,००० हॉटेल्स, गेस्ट हाऊसनी नोंदणी केली. होम स्टे च्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केला जात आहे. शंभर महिलांना सुरुवातीला अर्थसहाय्य केले जाईल, असेही खंवटे म्हणाले.
पर्यटन विकासासाठी ३५० कोटी रुपयांचे प्रस्तावित प्रकल्प
पर्यटकांचे नंदनवन म्हणून असलेली गोव्याची ओळख जपतानाच, राज्याच्या पर्यटन वृध्दीसाठी आता साडेतीनशे कोटी रूपयांच्या अनेक सकारात्मक बदलांच्या योजना सरकारने आखल्याची माहिती काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत दिली. पर्यटन खात्याच्या अनुदान मागण्यांवरील सभागृहातील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी पर्यटन वाढीसाठी केलेल्या योजनांचा उल्लेखही केला.
'कोविडपूर्वी गोव्यात जेवढे पर्यटक येत होते त्याच्यापेक्षा जास्त आता येतात. देशी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, असा दावा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल विधानसभेत केला. पर्यटन खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. खंवटे म्हणाले की, गेल्या जानेवारी ते जून या कालावधीत एकूण ५.४५ दशलक्ष पर्यटकांचे आगमन झाले.
५.१८ दशलक्ष देशांतर्गत आणि ०.२७ दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेट दिली. वर्षभरातील वाढ ८.४ टक्के आहे. गोव्यात विमानांच्या १८० फेऱ्या आता रोज होत आहेत. गोवा ते गेटविक (लंडन) विमानसेवा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होईल. त्यासाठी एअर इंडियाशी बोलणी केलेली आहे. पर्यटन क्षेत्रात इज ऑफ डूइंग बिझनेसला प्राधान्य दिले जात आहे.
लोक, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या तीन मुख्य स्तंभांवर आधारित पुनरुत्पादक पर्यटन सुरू करणारे गोवा हे भारतातील पहिले राज्य आहे. 'गोवा बियॉन्ड बीचेस' उपक्रम या धोरणात महत्त्वाची भूमिका बजावतो. संख्येपेक्षा दर्जेदार पर्यटकांना आकर्षित करणे हा उद्देश आहे. कोविड दरम्यान, मानसिकतेत बदल झाला आणि 'वर्क फ्रॉम होम' संस्कृती लोकांनी स्वीकारली. या ट्रेंडने गोव्याला नॉलेज हब आणि भारताची सर्जनशील राजधानी म्हणून स्थान देण्याची दृष्टी आम्हाला दिली.
यावेळी आमदार वेंझी व्हिएगश यांनी स्थानिक उपक्रम आणि गावातील परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी किमान पाच गावांसाठी पाच ते दहा लाखांचे छोटे बजेट द्यावे, अशी मागणी केली. तसेच समुद्रकिनाऱ्यांवर २० ते २५ कॅमेरे बसवण्याची विनंती त्यांनी केली. गोव्यातील उत्सवांना संरचित पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी स्पष्ट रोडमॅपची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये तलावाच्या पुनर्विकासाची मागणी केली. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून संगीतमय कारंजे बसवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी गोव्यातील पर्यटनाच्या सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत केपे मतदारसंघात अंतर्गत भागाच्या पर्यटनावर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी केली.
संगीतासाठी वेळ वाढवून द्या : युरी
विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव म्हणाले की, समुद्रकिनारी होणाऱ्या लग्नांसाठी गोवा एक प्रसिद्ध ठिकाण आहे, परंतु मंजुरीच्या लांबलचक प्रक्रियेमुळे अडथळे येतात. जोडप्यांना जलद व्यवस्था पसंत असते, त्यांना वेळखाऊ प्रक्रिया नको आहे. संगीतासाठी वेळ वाढवण्याचीही गरज आहे.
गोवा ऑनलाइन पोर्टलशी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) जोडण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून एआय-संचालित चॅटबॉट लवकरच सुरू केला जाईल, ज्यामुळे नागरिकांना सेवा अधिक सहज आणि कार्यक्षमतेने मिळू शकतील., असे खंवटे म्हणाले. छपाई व मुद्रण विभाग पर्यावरणपूरक बनवण्यासाठी, कचरा कमी करण्यासाठी आणि अधिक कार्यक्षमतेसाठी आधुनिक मशीन आणण्याची सरकारची योजना आहे. - रोहन खंवटे, आयटी मंत्री