लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येथील बाजारात कैऱ्यांपाठोपाठ आता आंबेही दाखल झाले आहेत. बाजारात हापूस आंबे ३ हजार रुपये डझन, तर कैऱ्या १०० रुपयांना ५ या दराने मिळत आहेत. राज्यात साधारणतः मार्च महिन्यापासून आंब्याचा हंगाम सुरू होतो. मात्र, यंदा फेब्रुवारीतच आंबे दाखल होऊ लागले आहेत.
येथील बाजारातील ठराविक विक्रेत्यांकडेच हे आंबे उपलब्ध झाले आहेत. मात्र, त्यांची आवक कमी असल्याने त्यांचे दर जास्त आहेत. सध्या हापूस आंबे ३ हजार रुपये डझन या दराने मिळत आहेत. याशिवाय पणजी बाजारात कैऱ्यांची आवक वाढू लागली आहे.
भाज्यांचे दर स्थिर
सध्या बाजारात मध्यम आकाराच्या कैऱ्या १०० रुपयांना पाच, तर लहान आकाराच्या कैऱ्या १०० रुपयांना १२ ते १४ या दराने मिळत आहेत. कैऱ्या महाग असूनही त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अन्य भाज्या जसे बटाटा, टोमॅटो, चिटकी, भेंडी आदींचे दर स्थिर आहेत. पणजी बाजारात सध्या मटारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ती ८० रुपये या दराने मिळत आहेत.