पणजी : समान वेतनश्रेणीच्या प्रश्नावर सरकार चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ सरकारी कर्मचारी सोमवारी एक दिवसाचा ‘पेन डाउन, टूल डाउन’ लाक्षणिक संप करणार आहेत. कर्मचारी कामावर हजेरी लावतील; परंतु कोणतेही काम करणार नाहीत. अखिल गोवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर म्हणाले की, आम्हाला या प्रश्नावर जनतेला त्रास द्यायचा नाही. त्यामुळे फेरीबोट, इस्पितळे, वीज, पाणी व अन्य अत्यावश्यक सेवा देणाऱ्या खात्यांमधील कर्मचारी काम करतील. वेतनश्रेणीतील तफावतीमुळे ३0 हजार कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असल्याचा संघटनेचा दावा असून तो दूर होईपर्यंत लढा चालूच ठेवणार असल्याचे शेटकर यांनी सांगितले. सरकारला कायद्यानुसार संपाची दिलेल्या नोटिसीची मुदत १४ आॅगस्टला संपली. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी चर्चेसाठी वेळ मागितली; पण ती दिली गेली नाही, असेही ते म्हणाले. राज्यात सुमारे ५८ हजार सरकारी कर्मचारी आहेत. समान वेतनश्रेणीच्या मागणीचा पाठपुरावा २0१0 सालापासून चालू आहे. ४0 वर्गवारींत कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आली. ते करताना वरील कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जुलै २0१२ पर्यंत हा प्रश्न धसास लावण्याचे आश्वासन दिले; परंतु ते पाळले नाही, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)
सरकारी कर्मचारी आज संपावर
By admin | Updated: August 18, 2014 01:21 IST