लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : उत्तर प्रदेशात १४४ वर्षांनंतर सुरू झालेल्या पूर्ण महाकुंभ मेळ्याला गोमंतकीयांनी जाऊन पवित्र स्नान घ्यावे, याउद्देशाने मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी देवदर्शन योजनेंतर्गत हिंदू भाविकांना प्रयागराज येथे पाठवण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी लवकरच गोमंतकीयांसाठी रेल्वे गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले. मी केलेली मागणी पूर्ण होत असल्याने आनंद होत आहे. मुख्यमंत्री सावंत यांचे आभार, असे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.
आमदार साळकर म्हणाले की, राज्य सरकारची देवदर्शन योजना पुन्हा सुरू करून त्यातून गोमंतकीयांना प्रयागराजला नेण्यात येणार आहे. ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. गोमंतकीय बांधवांना कुंभमेळ्याला जाण्याची सोय व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
भविष्यात देवदर्शन योजनेंतर्गत सर्वधर्मीयांना धार्मिक स्थळावर नेण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे. यात तिरुपती, शिर्डी, वालंकणी, अजमेर शरीफ अशा धार्मिक स्थळांचा समावेश असेल.