मडगाव : राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय सुरू करावे, अशी मागणी दक्षिण गोवा वकील संघटनेने केली आहे. या संघटनेतर्फे याच विषयावर दि. २५ रोजी येथील रवींद्र भवनात सकाळी दहा वाजता एका चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष वकील राजीव गोम्स यांनी शनिवारी मडगावात पत्रकार परिषदेत हीमाहिती दिली. या वेळी ज्येष्ठ वकील आनाक्लेत व्हिएगस, संघटनेचे अन्य पदाधिकारी एल्विस फर्नांडिस, क्रॉनी डिसिल्वा, कपिल वेरेकर व प्रियेश मडकईकर हे उपस्थित होते.गोवा राज्य झाल्यानंतर राज्यघटनेनुसार येथे उच्च न्यायालय सुरू होणे गरजेचे होते. मात्र, अजूनही मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. गोव्यात स्वंतत्र उच्च न्यायालय सुरू करावे, ही आमची जुनी मागणी असल्याचे वकील गोम्स यांनी सांगितले. रवींद्र भवनात होणाऱ्या चर्चासत्रात या विषयावर चर्चा होईल. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सुरेश होसपटी, तसेच फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई, वकील अमृत कासार, माजी आमदार दामोदर नाईक व इतर मिळून १३ ते १४ वक्ते या चर्चासत्रात भाग घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यघटनेच्या २१४ कलमानुसार प्रत्येक राज्यात स्वतंत्र उच्च न्यायालय हा हक्क असल्याचे ज्येष्ठ वकील आनाक्लेत व्हिएगस यांनी सांगितले. गेली २0 वर्षे आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत; पण काही राजकारण्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालय अजूनही सुरू झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या आरोपाला पुष्टी देताना उच्च न्यायालयासंबंधी बिल तयार करून ठरावही करण्यात आला होता. त्याचे पुढे काय झाले याचा कुणालाही थांगपत्ता नसल्याचे ते म्हणाले. शनिवारी आयोजित चर्चासत्रात दक्षिण गोवा वकील संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी वकिली सेवेची ५0 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालय हवे!
By admin | Updated: April 19, 2015 01:03 IST