लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी व अन्य तत्स्म कारणे यामुळे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा तर वयोमान व निष्क्रीयतेचा ठपका आल्याने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा पत्ता कट झाला. अर्थात दक्षिण गोव्यात ख्रिस्ती मतदारांवर प्रभाव टाकणे हा विरियातो यांना तिकीट देण्यामागिल काँग्रेसचा मूख्य हेतू आहे अशी माहिती मिळाली.
लोकसभेसाठी दोनपैकी एकाही जागेवर काँग्रेसने ओबीसी किंवा एसटी उमेदवार दिलेला नाही. भाजपने श्रीपाद नाईक यांच्या रुपाने उत्तर गोव्यात ओबीसी उमेदवार दिला. दक्षिण गोव्यात भंडारी समाजाचे गिरीश चोडणकर यांचे नाव चर्चेत होते. परंतु त्यांना डावलण्यात आले.
चोडणकर हे ख्रिस्ती मतदारांवर प्रभाव टाकू शकणार नाहीत असे काँग्रेसच्या हायकमांडला वाटले. सार्दिन हे ख्रिस्ती धर्मिय असून त्यांचा पत कट करायचा असेल तर ख्रिस्ती उमेदवारालाच पुढे करावे लागेल हे काँग्रेसच्या श्रेष्ठींनी जाणले.
भाजपकडून दक्षिणेत पल्लवी धेपे यांची उमेदवारी जाहीर होईपर्यंत विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, आमदार एल्टन डिकॉस्ता वगैरे गिरीश चोडणकर यांच्या समर्थनात होते परंतु पल्लवींची तिकीट जाहीर झाल्यानंतर या दोघांचाही सूर बदलला. दुसरीकडे सार्दिन यांच्या नावाला इंडिया आघाडीतील घटक गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यानी विरोध केला होता.
काँग्रेस उमेदवार लादत नाही, लोकशाही पद्धतीने निवडते : अमित पाटकर
अमित पाटकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना श्रेष्ठिनी गोव्यातील जनतेला काय हवे त्यानुसारच उमेदवार दिला असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, उमेदवार लादायला काँग्रेस म्हणजे भाजप नव्हे, काँग्रेसमध्ये सर्व काही लोकशाही पध्दतीने चालते. उमेदवारी मिळाली नाही म्हणून काहीजण नाराज असतील परंतु ते पक्षासोबतच आहेत. सार्दीन यांना विद्यमान खासदार असूनही तिकीट नाकारली. कदाचीत त्यांच्यावर श्रेष्ठींना अन्य एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवायची असावी.
...ही बाजू ठरली खलपांसाठी जमेची
उत्तर गोव्यात रमाकांत खलप यांची मतदारांना ओळख करुन द्यावी लागणार नाही. ते सर्व परिचित आहेत. उलट विजय भिके किंवा सुनिल कवठणकर यांना तिकीट दिली असती तर त्यांची मतदारांना ओळख करुन देण्यातच वेळ गेला असता या भावनेतून खलप यांना श्रेष्ठींनी तिकीट दिली असावी. त्यातल्या त्यात कॉग्रेसला अनुकूल असे बार्देस व तिसवाडी असे दोनच तालुके आहेत. व या तालुक्यांवरच खलप यांची मदार असेल. सत्तरी तालुक्यातील भाजपचे मताधिक्क्य कव्हर करुन आघाडी मिळवायची झाल्यास काँग्रेसची भिस्त वरिल दोन तालुक्यांवरच असेल.
३० वर्षात प्रथमच मागितले होते तिकीट : गिरीश चोडणकर
'लोकमत'ने गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, गेल्या तीस वर्षात मी प्रथमच तिकीट मागितले होते व पूर्वतयारीही केली होती. पक्षाने जो काही निर्णय घेतला तो पूर्ण विचारांतीच असेल. पक्षाचा निर्णय मला शीरसावंद्य आहे. उमेदवार जाहीर केल्यानंतर मी कोणत्याही केंद्रीय नेत्यांशी संपर्क साधलेला नाही किंवा पूर्वी तिकिटासाठीही लॉबिंग केलेले नाही.