लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा राज्य विधानसभेचे तीन दिवसांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ मार्च ते २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्यपाल पी. ई. एस. श्रीधरन पिल्लई यांनी काल, शनिवारी जारी केलेल्या आदेशानुसार राज्याच्या आठव्या विधानसभेचे नववे अधिवेशन सोमवार, दि. २४ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता बोलावले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला ६ आणि ७फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभेचे आठवे अधिवेशनदेखील अल्पकाळाचे होते. कमी दिवसांचे अधिवेशन बोलावल्यामुळे यापूर्वी विरोधकांनी वारंवार सरकारवर टीका केली होती. नवीन आदेशानंतरही विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, सभापती रमेश तवडकर यांनी मार्च महिन्यात दीर्घ कालावधीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावणार असल्याचे आश्वासन दिले होते. प्रत्येक वेळी अशी आश्वासने ते देतात, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. कारण सरकारमधील मंत्री भ्रष्टाचार आणि कमिशनमध्ये गुंतलेले असल्याचा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
राज्यात गाजलेले नोकरीकांड, बेकायदेशीरभू-रूपांतर, भू-बळकाव प्रकरणाचा मास्टरमाईंड सुलेमान प्रकरण, राज्याची जीवनदायनी म्हादई नदी, रस्ते अपघात यावर चर्चा करण्याचे धाडस सरकार करणार का? गोव्याची जनता या हुकूमशाही सरकारला माफ करणार नाही. विधानसभेचे अधिवेशन कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध आहे. या अधिवेशनात विरोधक संयुक्तपणे भ्रष्ट सरकारचा पर्दाफाश करतील. - युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते