पणजी : पावसाच्या उच्छादामुळे कामराभाट, पीटरभाट येथून रातोरात स्थलांतरित व्हावे लागलेले लोक अजून शाळांच्या छताखालीच आहेत. त्यांच्या घरातील पाणी ओसरले आहे; परंतु थरकाप उडविणारी भीती मात्र गेलेली नाही. जोरदार पाऊस पडत होता, असा पाऊस आम्हाला नवीन नसल्यामुळे निश्चिंत झोपलो होतो. समुद्राची एक लाट यावी, असे झोपलेल्या ठिकाणी पाण्याचा हलका प्रवाह अंथरुणावर आला आणि काय घडते आहे, हे कळण्यापूर्वीच घराचे तळे झालेले. आवरा-आवर आणि सावरा-सावर करायलाही वेळ नव्हता. संसार तेथेच टाकून मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो, ही प्रतिक्रिया होती पिटरभाटात राहणाऱ्या परशुराम अनावार यांची. परशुराम यांचे कुटुंब येथील आयडीएल हायस्कूलमध्ये वस्तीला आहे. त्यांच्याबरोबर आणखी किमान ६० कुटुंबे येथे राहात आहेत. रामा खोलकर यांनी सांगितलेला प्रसंग असाच शहारे आणणारा. अचानक आलेल्या पाण्यामुळे कुठे पूर आला की काय झाले हे त्यांना समजले नव्हते आणि विचार करायलाही वेळ नव्हता. कुटुंबीयांना घेऊन घराबाहेर पळणे एवढाच पर्याय त्यांच्याजवळ होता, असे ते म्हणाले. घरातील धान्य नष्ट झाल्याचे ते म्हणाले. याच वस्तीत राहणारे अशोक हुनचिलेटी म्हणाले की, आपला जन्मच पिटरभाटमध्ये झाला. असा प्रसंग कधीच आला नव्हता. पावसात पूर येईल आणि तो घरात येईल, अशी कधी कल्पनाही केली नव्हती. बाउला खोलकर या महिलेने तर आता पुन्हा असे घडू नये, असे म्हणत देवाला साकडेच घातले. आता घरातील पाणी ओसरले आहे; पण राहायला जाण्यासारखी स्थिती नाही. साचलेला गाळ काढणे, सफाई करणे, जमीन सुकणे या गोष्टी केव्हा होतील तेव्हाच घरे राहण्यालायक होतील. परंतु घरात परत केव्हा जाणार, असे विचारले असता प्रवीण गिरप यांनी सोमवारी जाणार, असे सांगितले. जी गोष्ट पीटरभाटची तीच गोष्ट कामराभाटमधील लोकांची. येथील लोकांनी कामराभाट येथील सरकारी विद्यालयाच्या इमारतीचा आसरा घेतला आहे. (प्रतिनिधी)
मुलाबाळांना घेऊन पळालो!
By admin | Updated: September 1, 2014 02:07 IST