पणजी : स्वस्त दरात मासळी पुरविण्याची योजना सरकार येत्या आॅक्टोबर महिन्यापासून सुरू करणार असल्याची माहिती आज विधानसभेत मच्छीमार खात्याचे मंत्री आवेर्तीन फुर्तादो यांनी दिली. मासळीचे दर वाढत असल्यामुळे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार विशेष योजना सुरू करणार आहे. फिरत्या व्हॅनमधून मासे पुरवठा करण्यात येणार आहे. हे दर सध्याच्या बाजारातील दरांपेक्षा कमी असतील. होलसेल दरातच ती लोकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ती लोकांना स्वस्तात मिळणार असल्याची माहिती फुर्तादो यांनी दिली. मासळी एका जागेहून दुसऱ्या जागेत नेण्याचा वाहतूक खर्च हा मासेविक्रीतून वजा करून घेतला जाणार नाही. त्यासाठी सरकार वेगळी तरतूद करणार आहे. त्यामुळे स्वस्त दरात मासे पुरविणे मच्छीमार खात्याला परवडणार आहे. मासळीच्या वाढत्या दरांवर सरकारचे नियंत्रण आहे काय, असा प्रश्न आमदार रोहन खंवटे यांनी विचारला होता. नियंत्रण असेल, तर दिवसेंदिवस मासळीचे दर वाढत का आहेत, असे त्यांनी विचारले होते. यावर माशांची आवक कमी होत चालल्यामुळे दर वाढत असल्याचे मच्छीमारमंत्र्यांनी सांगितले होते. सवलतीच्या दरात मासेविक्री करणे हा दरावर नियंत्रण करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार विष्णू वाघ यांनीही या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मच्छीमार खात्याच्या सोयीसुविधा आणि सवलती घेऊन मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी ट्रॉलर मासेमारी करतात. काहीजणांचे चार-पाच ट्रॉलर असतात. माशांची निर्यातही केली जात आहे आणि असे असताना या व्यवसायातून सरकारला महसूल का मिळत नाही, असा प्रश्न केला होता. काणकोणला प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या मासळी उत्पादन प्रकल्पाची फलश्रुती आमदार सुभाष फळदेसाई यांनी विचारली होती. त्या वेळी हा प्रकल्प महसूल मिळविणारा असल्याचे आढळून आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे लोकांना ताजे मासे मिळाले. प्रकल्पावर ३ लाख रुपये खर्च करण्यात आला होता आणि त्यापासून ५.८० लाख रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आॅक्टोबरपासून स्वस्तात मासे
By admin | Updated: July 25, 2014 01:51 IST