पणजी : अगोदर खाण प्रश्न सोडविला जाणार आणि नंतरच नव्या प्रादेशिक आराखड्याचा विषय हाताळला जाणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आमदार विजय सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेत सांगितले. अडीच वर्षे प्रलंबित प्रादेशिक आराखड्याची सद्यस्थिती काय आहे आणि तो कधी अधिसूचित करण्यात येणार आहे, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण झाले तेव्हा खाण समस्या अस्तित्वात नव्हती; परंतु ती नंतर उत्पन्न झाली आणि त्यामुळे प्रादेशिक आराखड्यास पूर्ण वेळ देणे शक्य झाले नाही. आता खाण प्रश्न अगोदर सोडविण्यात येईल आणि नंतर प्रादेशिक आराखड्याचा विषय हाती घेण्यात येईल. आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत खाण धोरण निश्चित करण्यात येईल. आॅगस्ट महिन्यात संबंधित घटकांची विशेष बैठक बोलविण्यात येईल. लिज धोरणही त्या वेळी निश्चित करण्यात येणार आहे. समस्या सुटेल, असा अंदाज आहे. त्यानंतर प्रादेशिक आराखड्याचा प्रश्न निकालात काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींना विचारात घेण्यात येणार आहे काय, असे सरदेसाई यांनी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी काही अपवाद सोडल्यास पंचायती आणि पालिकांना अधिकार देण्यात येणार आहेत. तशी तरतूद पंचायत कायद्यात दुरुस्ती करून करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. (प्रतिनिधी)
प्रथम खाण प्रश्न; नंतर आराखडा
By admin | Updated: July 25, 2014 01:50 IST