सद्गुरू पाटील, संपादक, गोवा
भाजपमधील गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील हेवेदावे सर्वश्रुत आहेत. मूळ भाजप आमदाराचे मूळचे कार्यकर्ते आणि पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप दिलजमाई झालेलीच नाही. मात्र २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत ती होईल, अशी आशा आमदार व मंत्री बाळगून आहेत. यावेळी भाजपने अतिशय योग्य व्यक्तींना उत्तर व दक्षिण अध्यक्ष केले.
भाजपमध्ये गटबाजी कमी नाही. केवळ नेत्यांमध्येच गटबाजी आहे, असेही नाही. कार्यकर्त्यांच्या स्तरावर मोठी आणि जास्त कंपूशाही आहे. एकूण तीन गट सध्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. हे तीन गट पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्तरावरील आहेत. बूथ स्तरावर, मंडळ स्तरावर ही गटबाजी आहे. काँग्रेसमधून किंवा अन्य ठिकाणहून जे नेते भाजपमध्ये आले, त्यातून गोव्यात भाजपचा पाया वाढला, विस्तार वाढला हे मान्य करावे लागेल. भाजपमध्ये नेत्यांची, आमदारांची आयात ही मनोहर पर्रीकर यांच्या हयातीतच सुरू झाली होती. अर्थात पक्ष मजबूत करायचा असेल, विस्तार करायचा असेल तर आयात ही करावीच लागते. २०२४ सालापासून भाजपमध्ये आयात धोरण वाढले. विविध राज्यांमध्ये भाजपने ज्या नेत्यांना टार्गेट केले होते, काहीसे बदनाम केले होते, त्यांना पक्षाची दारे खुली केली गेली. तुम्ही आमच्या पक्षात या, मग तुमच्या मागे कोणत्याच केसीस येणार नाहीत, गुन्हे नोंद होणार नाहीत असे धोरण पक्षाने स्वीकारले. त्यामुळे भराभर अन्य पक्षीय आमदार, नेत्यांनी भाजपमध्ये उड्या टाकल्या. गोव्यातदेखील दिगंबर कामत यांच्यासह बाबू कवळेकर आदी अनेक नेते अगदी सेफ झोनमध्ये पोहोचले. महाराष्ट्रात अशोक चव्हाण, नारायण राणे वगैरेंचे अत्यंत सुरक्षित जागी लैंडिंग झाले. या नेत्यांसोबत, आमदारांसोबत कार्यकर्तेही मोठ्या संख्येने भाजपमध्ये आले आहेत. गोव्यात बाबूश मोन्सेरात, विश्वजित राणे, मायकल लोबो, डिलायला लोबो, रोहन खंवटे आदींसोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व समर्थक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी हजारो लोक आता भाजपचे प्रथमच सदस्यही झाले आहेत.
अजून काही आमदार विचारतात की, मी भाजपमध्ये कधी येऊ? मुख्यमंत्री सावंत यांच्या संपर्कात अजून एक- दोन अन्य पक्षीय आमदार आहेत. त्यांनाही भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. मांद्रेचे जीत आरोलकर यांचाही समावेश यात आहे. एकंदरीत २०२७ ची विधानसभा निवडणूक येईल तेव्हा गोव्यातील भाजपमध्ये आणखी काही नेत्यांचे लैंडिंग झालेले असेल, आणखी काही कार्यकर्ते अन्य पक्षांतून भाजपमध्ये त्यावेळी येतील. भाजपचा हा विस्तार सुरूच राहील. मात्र विस्तारासोबत पक्षात भेदभाव वाढत जाईल.
नवे-जुने कार्यकर्ते, आमचे मूळचे कार्यकर्ते आणि परक्या किंवा दुसऱ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते असा पक्षपात किंवा भेदभाव भाजपमध्ये वाढीस लागला आहे. कधी कवळेकरांसह कधी विश्वजितसोबत कधी दिगंबर कामतांसोबत तर कधी संकल्प आमोणकरसोबत भाजपमध्ये आलेले कार्यकर्ते आणि भाजपचे जुने कार्यकर्ते त्यांच्यात मनापासून एकी होत नाही. त्यांचे मनोमीलन चांगल्याप्रकारे होत नाही हे डिचोलीतही अनुभवास येतेच. डिचोलीचे आमदार तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आहेत, बाकी ते भाजपसोबत व भाजप सरकारसोबत आहेत. मात्र त्यांचे कार्यकर्ते व मूळ भाजप कार्यकर्ते यांच्यात एक दरी आहेच. सदस्य नोंदणी मोहिमेवेळीही याचा अनुभव आला. हे केवळ डिचोलीतच आहे असे नाही, तर अन्य काही मतदारसंघांतही तेच घडतेय. याच भेदभावातून गेल्यावेळी केपे मतदारसंघात बाबू कवळेकर यांचा पराभव झाला. कार्यकर्त्यांमध्ये एकी झालीच नव्हती. काही प्रमाणात रोहन खंवटे यांनी पर्वरीत एकी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना कितपत यश आलेय हे तेच सांगू शकतील. शिरोड्यात सुभाष शिरोडकरांचे कार्यकर्ते वेगळे आहेत. त्यांची व मूळ भाजप कार्यकर्ते यांची पूर्णपणे एकी झालीय का है पाहावे लागेल.
पणजीत मात्र कार्यकर्त्यांत फूट पडली आहे. काही कार्यकर्ते उत्पल पर्रीकरांसोबत अजूनही राहिले आहेत. अनेकजण बाबूश मोन्सेरात यांच्यासोबत आले आहेत. समजा भविष्यात मोन्सेरात यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये उडी टाकली, तर ते अशा कार्यकर्त्यांना आपल्यासोबत घेऊन जातील. तेवढी जादू त्यांनी कार्यकर्त्यांवर केलेली आहे. काहीजणांना स्टारबक्सची कॉफी त्यामुळेच आठवते. बाबूशचे काळीज हत्तीचे आहे, असेही आता कार्यकर्ते जाहीरपणे सांगू लागलेत. एवढे चांगले विशेषण तर कधी पर्रीकर यांच्या हृदयालाही मिळाले नव्हते.
काही मतदारसंघांमध्ये आमदार व मंत्रीही आपल्या कार्यकर्त्यांचे वेगळे गट तयार करत आहेत. यावेळी काही आमदारांनी भाजपची सदस्य नोंदणी करताना सुरुवातीला फारसा उत्साह दाखवला नव्हता. मग पक्षाने दबाव वाढविल्यानंतर उत्साह दाखवावा लागला.
भाजपची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सध्या बरीच पुढे गेली आहे. मंडळ अध्यक्ष निवडले गेले, जिल्हा अध्यक्षही निवडले गेले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी काल म्हापशात भाजपच्या कार्यक्रमावेळी भाषण केले. त्यांनीही कार्यकर्त्यांना सल्ला दिला की हे नवे आणि ते जुने असा भेदभाव कार्यकर्त्यांनी पक्षात करू नये. भेदभावामुळे पक्षाचे नुकसान होतेय वगैरे मुख्यमंत्र्यांनी नेमकेपणाने सांगितले आहे.
वास्तविक दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा पराभव होण्यास हा भेदभावदेखील कारणीभूत ठरला आहे, हे एक पत्रकार या नात्याने मला त्यावेळी दिसून आले. दक्षिण गोव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी एवढी होती की पल्लवी धेपे यांना उमेदवार म्हणून काही गटांनी स्वीकारलेच नाही. खुद्द श्रीनिवास धेपे जेव्हा विविध मतदारसंघांत प्रचारासाठी फिरले तेव्हा त्यांनादेखील कळून आले की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विविध गट आहेत. काँग्रेसमधून आलेले कार्यकर्ते व मूळ भाजप कार्यकर्ते यांच्यात एकी झालेलीच नाही. पल्लवी धंपेंचा पराभव होण्यास तेही एक कारण ठरले, पण हे कधी कुणी जाहीरपणे मांडले नाही.
भाजपमध्ये कधी म.गो. तर कधी काँग्रेसमधून आमदार आले म्हणून पक्षाची अधिक वाढ झाली. समजा विश्वजित आले नसते तर पर्ये व वाळपईची जागा भाजप जिंकला नसता. रवी नाईक आले नसते तर फोंड्यात भाजपचे कमळ फुलले नसते. जेनिफर मोन्सेरात आल्या नसत्या तर ताळगावमध्ये भाजप जिंकलाच नसता. खंवटे आले नसते तर पर्वरीत भाजप जिंकणे महाकठीण झाले असते. हीच स्थिती अन्य काही मतदारसंघांबाबतही आहे. गोविंद गावडे आल्यामुळेच प्रियोळ मतदारसंघ भाजप जिंकू शकला. गेली पंचवीस वर्षे मडकई मतदारसंघ भाजप जिंकू शकलेला नाही. कारण सुदिन ढवळीकर मगो पक्षातच राहिले आहेत. भाजपला आपली बलस्थाने आणि विक पॉइंट्स हे दोन्ही चांगले ठाऊक आहेत. कार्यकर्त्यांना ते कळत नाहीत, त्यामुळेच त्यांच्यात अद्याप एकी झालेली नाही. कदाचित २०२७ पर्यंत एकी होईल, असे पक्षातील नेत्यांना वाटू शकते.