लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतून महिलांचे सक्षमीकरण होत आहे. त्यातून त्यांना सन्मानाचे जीवन प्रदान केले गेले आहे. डबल इंजिन सरकारमुळे गेल्या अकरा वर्षात केवळ मूलभूत पायाभूत सुविधांचाच नव्हे तर मानव संसाधन विकासही झाला आहे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी मिरामार येथे आयोजित 'अनुभूती - आर्थिक समावेशन : समृद्धीचा मार्ग' या राष्ट्रीय मेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार सदानंद शेट तानावडे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्मृती शरण, ग्रामीण विकास सचिव संजय गोयल उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'केंद्र सरकारची प्रत्येक योजना महिला सबलीकरणासाठी आणली जात आहे. स्वयंपूर्णता, विश्वास आणि प्रतिष्ठा यावर भर दिला जात आहे.या निमित्ताने ग्रामीण विकासावर विचारमंथन होईल तेव्हा महिलांचा उत्कर्ष केंद्रबिंदू असावा. मुख्यमंत्री म्हणाले की, 'गेल्या ६० वर्षात महिला सक्षमीकरणासाठी गंभीरपणे विचार झालाच नाही. परंतु केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्याला चालना मिळाली. दारिद्रय निर्मूलनासाठीही मोदी यांनी विविध योजना आणल्या.
तीन दिवस विचारमंथन
'अनुभूती' मेळावा पुढील तीन दिवस चालणार असून, वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी दाखल झालेले आहेत. ग्रामीण विकासाबाबत मेळाव्यात विचारमंथन होणार आहे.
जोडल्या ४८ हजार महिला
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'राज्यात रूरल मिशन सुरू झाल्यापासून ३२५० महिला सेल्फ हेल्प ग्रुप स्थापन झाले. ४८ हजार महिला या ग्रुपशी निगडित आहेत. ११२० महिला सेल्फ हेल्प ग्रुपनी कर्ज घेऊन व्यवसाय केला. सुमारे ३५० कोटी रुपयांची उलाढाल अल्पावधीत झालेली आहे. राज्यात ४२० नोंदणीकृत गावे आहेत. पैकी २१० ठिकाणी म्हणजेच ५० टक्के गावांमध्ये ग्राम संघटना स्थापन झालेल्या आहेत. महिलांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.