पणजी : विधानसभा निवडणुका जानेवारीच्या अखेरीस होतील, अशी चर्चा असली तरी आपल्याला या निवडणुका मार्च २०१७ मध्येच होणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी सांगितले. या प्रतिनिधीशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ साली मार्चमध्ये निवडणुका झाल्या होत्या. आता आम्ही मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाऊ पाहत नाही. मला तर वाटते की, एक दिवस देखील अगोदर निवडणूक होऊ नये. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत असल्याने त्या वेळीच निवडणुका व्हाव्यात. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निवडणुका होण्याच्या बाजूने माझी भूमिका नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, आमदारांनी मतदारसंघांमध्ये कामे जलदगतीने करून घ्यावीत म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका जानेवारीच्या अखेरीस होतील, असे म्हणत आहोत. किंवा तशा प्रकारची चर्चा त्यामुळेच सुरू झाली आहे. सर्व विकासकामे लवकर व्हावीत या दृष्टिकोनातूनच भाजपच्या शनिवारी झालेल्या मंत्री-आमदारांच्या बैठकीत चर्चा केली गेली. त्याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील, असा होत नाही. निवडणुका मार्चमध्येच होतील, असे मला वाटते. (खास प्रतिनिधी)
मार्च २०१७ मध्येच निवडणुका व्हाव्यात!
By admin | Updated: January 5, 2016 02:08 IST