पणजी - आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण फक्त जास्त गुण मिळवण्यामागे धावत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ गुणांऐवजी चौकस बनण्यावर भर द्यायला हवा, असे आवाहन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात असून, त्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्दीने वाटचाल करावी, असेही ते म्हणाले.ते पणजी येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अलोक अराधे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कनिष्ठ वकिलांना मार्गदर्शनपाच वर्षांचा अभ्यासक्रम : कायद्याचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे शिक्षणव्यवस्थेत मोठा बदल झाल्याचे सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले.अनुभवी वकिलांना सल्ला : तरुण वकिलांचे कायद्याचे ज्ञान पाहून सरन्यायाधीशांनी कौतुक केले आणि अनुभवी वकिलांनीही त्यांच्याकडून शिकावे, असे ते म्हणाले.कनिष्ठ वकिलांचे प्रश्न : सरन्यायाधीश गवई यांनी कमी वेतन आणि इतर समस्यांवरही चर्चा केली.
महाविद्यालयाचे कौतुकसरन्यायाधीश भूषण गवई यांनी सामाजिक बांधीलकी जपणारे उद्योजक व्ही. एम. साळगावकर यांनी गोव्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या महाविद्यालयाचे कौतुक केले. या संस्थेने गोव्याच्या न्यायव्यवस्थेचा पाया मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे ते म्हणाले.
सरन्यायाधीशांनी जागवल्या आठवणीसरन्यायाधीश गवई यांनी महाविद्यालयीन जीवनातील आठवणी सांगितल्या. ‘मी अनेकदा वर्ग चुकवायचो; पण माझे मित्र माझी वर्गात उपस्थिती लावायचे. मात्र, मी जेव्हा अभ्यास करायचो, तेव्हा पूर्ण एकाग्रतेने करायचो. यामुळे या स्थानापर्यंत पोहोचलो,’ असे ते म्हणाले.