लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : विकासाचे प्रत्येक पाऊल उचलताना युवकांचा विचार केला जात आहे. राज्याचे हित सांभाळणारे आधुनिक प्रकल्प येत आहेत. प्रकल्प राबवत असताना निसर्ग सुरक्षित राहील याची काळजी आमचे सरकार घेते. केवळ विरोधासाठी प्रकल्पांना विरोध करू नका. त्या प्रकल्पाचा सर्वकष अभ्यास करा. आम्ही घातक प्रकल्प टाळून कल्याणकारी प्रकल्प आणण्यासाठी पावले उचलत आहोत. त्याला सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
कला व संस्कृती संचालनालय, गोवा जागर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियोळ येथे आयोजित केलेल्या जागोर महोत्सवात ते बोलत होते. त्यांच्याबरोबर कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, श्रमेश भोसले, उद्योजक राजेश तारकर, अनेक पंचायतीचे सरपंच पंच सदस्य उपस्थित होते. यावेळी राघू गावडे, राजेंद्र गावडे, वसंत गावडे, दशरथ गावडे, रामा गावडे, गुरुनाथ गावस, गुरुदास गावडे, जानू गावडे, रामा गावडे, सोनू गावडे यांचा सत्कार झाला. रोहित खांडेकर यांनी सूत्रसंचालन केले.
३६५ दिवसही महोत्सव
गोव्याची ओळखच कलेचे माहेरघर अशी आहे. आम्ही सर्वजण उत्सवप्रिय आहोत. म्हणूनच राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कला व सांस्कृतिक महोत्सव आम्ही घडवून आणत आहोत. गोव्याच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे ३६५ दिवसही महोत्सव होत असतो. प्रत्येक महिन्याला शासकीय पातळीवरील भव्य असे महोत्सव घडून येतात, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
ग्रामीण भागात असलेल्या विविध मांडानी आमची संस्कृती जपून ठेवली आहे. जागोराच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती करण्याचे काम होत आहे. कष्टकरी समाजाचा हा उत्सव आम्ही असाच सांभाळून ठेवूया. पूर्वजांनी जागोवर सांभाळून ठेवला म्हणून नवी पिढी यामध्ये पीएच.डी. व संशोधन करीत आहे. - गोविंद गावडे, कला व संस्कृती मंत्री
आजच्या पिढीला कलेच्या क्षेत्रातसुद्धा आधुनिकता आवडत असली तरी, आमच्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेल्या परंपरेकडे त्यांना ओढण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करूया. कलेच्या माध्यमातून निसर्गाकडे एकरूप होण्याचे मार्ग आम्हाला पूर्वजांनी दिले आहेत. - सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री