सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव दुचाकी अपघातात विशीतील तरुणांचे बळी वाढू लागल्याने ही एक गंभीर समस्या बनू लागली आहे. त्यामुळे १८ वर्षीय युवक-युवतींना मोटरसायकल चालविण्याचा परवाना देण्यात येऊ नये, अशी शिफारस गोव्यातील वाहतूक विभागाने केंद्र सरकारला केली आहे. तीन दिवसांपूर्वी वेर्णा येथे मोटरसायकलचा स्टंट करताना मनीष सावंत या १९ वर्षीय युवकाचा बळी गेल्याने याविषयीची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मोटर व्हेईकल कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक राज्याकडून सूचना मागविल्या होत्या. १६ ते १८ या वयोगटांतील मुलांना गियर नसलेली बाईक चालविण्यासाठी परवाना दिला जातो. ही पद्धत बंद करावी, अशी सूचना गोव्यातर्फे करण्यात आल्याची माहिती वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी दिली. या शिवाय स्वत:ची बाईक वाहन परवाना नसलेल्या कुणालाही वापरायला दिल्यास जी व्यक्ती बाईक देते तिला पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपयांपर्यंत, तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा हजारांपर्यंतचा दंड आकारण्याची तरतूद करावी, अशीही शिफारस केल्याचे देसाई यांनी सांगितले. गेल्या सात महिन्यांत एकूण अपघाती बळींच्या २५ टक्के बळी हे १८ ते २५ या वयोगटातील युवक आहेत.
१८ वर्षांखालील युवकांना वाहन परवाना देऊ नका!
By admin | Updated: July 30, 2014 07:26 IST