लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यभर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गोवा क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत चेतन देसाई- बाळू फडके पॅनलने बीसीसीआयचे संयुक्त सचिव रोहन गावस-देसाई यांच्या परिवर्तन गटाचा दारुण पराभव केला. सर्व सहा जागा जिंकून प्रोग्रेस अँड युनिटी पॅनलने जीसीएवर निर्विवाद वर्चस्व राखले. एकूण सहा जागांसाठी हे निवडणूक झाली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश देसाई यांनी महेश कांदोळकर यांचा ६२-४५ अशा मतफरकाने पराभव केला. निवडणुकीत जीसीएशी संलग्न असलेल्या १०७ क्लबच्या प्रतिनिधींनी मतदान केले. अध्यक्षपदी महेश देसाई, उपाध्यक्षपदी परेश गोविंद फडते, सचिवपदी तुळशीदास शेट्ये, संयुक्त सचिवपदी अनंत शंभू नाईक, खजिनदारपदी सय्यद अब्दुल मजीद, आणि सदस्य पदावर महेश बेहकी निवडून आले. निवडणुकीत महेश कांदोळकर, राजेश पाटणेकर, दया पागी, रुपेश नाईक यांसारख्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला.
जीसीएची नवी कार्यकारिणी निवडीसाठी झालेल्या या निवडणुकीत सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात होते. देसाई-फडके आणि रोहन गावस-देसाई पॅनलमध्ये थेट लढत झाली. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान झाले. निवडणूक अधिकारी ए. के. जोती यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. दुपारी ४ नंतर मतमोजणी झाली. या निवडणुकीकडे राज्यभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले होते. त्यामुळे जीएसी स्टेडियम परिसरात मोठी गर्दी झाली होती.
अनंत नाईक यांना सर्वाधिक ७० मते
मतमोजणीमध्ये सुरुवातीपासून देसाई-फडके पॅनलच्या उमेदवारांचे वर्चस्व राहिले. या पॅनलच्या संयुक्त सचिवपदाचे उमेदवार असलेल्या अनंत नाईक यांनी सर्वाधिक ७० मते प्राप्त केली. त्यापाठोपाठ सदस्य महेश बेहकी यांना ६५, उपाध्यक्ष परेश फडते यांना ६३, अध्यक्ष महेश देसाई यांना ६२ मते मिळाली. तर विरोधात असलेल्या परिर्वतन पॅनलच्या एकाही उमेदवाराला ५० मतांचा आकडा ओलांडता आला नाही. या पॅनलचे खजिनदार पदाचे उमेदवार रुपेश नाईक यांनी सर्वाधिक ४८ मते मिळवली.
विजयी प्रोग्रेस अँड युनिटी पॅनल
अध्यक्ष - महेश देसाई (६२ मते)उपाध्यक्ष - परेश फडते (६३ मते)सचिव - तुळशीदास शेट्ये (५९ मते)संयुक्त सचिव - अनंत नाईक (७० मते)खजिनदार - सय्यद अब्दूल माजिद (५८ मते)सदस्य - महेश बेहकी (६५ मते)
पराभूत परिवर्तन पॅनल
महेश कांदोळकर (४५ मते)राजेश पाटणेकर (४३ मते)दया पागी (४३ मते)सुशांत नाईक (३६ मते)रुपेश नाईक (४८ मते)मेघनाथ शिरोडकर (४१ मते)
बाळू फडके आणि मी नेहमीच सोबत होतो. गेल्यावेळी जरा बदल झाला होता. मात्र, आता आम्ही सोबत आहोत. क्रिकेटच्या विकासासाठी नेहमीच निःस्वार्थीपणे काम केले जाईल. स्टेडियम उभारण्यासाठी पॅनल काम करणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहोत.- चेतन देसाई, प्रवर्तक, प्रोग्रेस अँड युनिटी पॅनल.
सर्व क्लबनी आमच्या पॅनलवर विश्वास ठेवून आम्हाला विजयी केले. बाळू फडके आणि चेतन देसाई यांचा आम्हाला पाठिंबा होता. विरोधकांना सोबत घेऊन क्रिकेट वर्तुळात परिवर्तन घडवण्यासाठी काम करू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारण्यास सोपे होईल. यासाठी सरकार व इतर पक्षांचा पाठिंबा आम्ही मिळवू. - महेश देसाई, नूतन अध्यक्ष, जीसीए.
राज्यात पुढील तीन वर्षे केवळ क्रिकेटचा विकास होईल. आम्ही जे पॅनल सर्व क्लबसमोर ठेवले, त्यातील बहुतांश उमेदवार स्वतः चांगले क्रिकेटपटू राहिले आहेत. त्यांना क्रिकेटबद्दल आस्था आणि ज्ञानही आहे. आता व्यवस्थापनच्या माध्यमातून ते क्रिकेटची सेवा करतील. सर्व क्लबना सोबत घेऊनकाम करू, - बाळू फडके, प्रवर्तक, प्रोग्रेस अँड युनिटी पॅनल.
आम्ही सुरुवातीपासून कुणाच्या विरोधात नव्हतो आणि यापुढेही असणार नाही. क्रिकेटचा विकास करायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन करावा लागणार आहे. विरोधकांनादेखील आम्ही सोबत घेऊनच काम करणार आहोत. मतभेद अवश्य आहेत, पण मनभेद कधीच नव्हते. - विपुल फडके, प्रर्वतक, प्रोग्रेस अँड युनिटी पॅनल.
जो निकाल लागला आहे, तो आम्हाला मान्य आहे. मी केवळ दोन वर्षे जीसीएच्या सचिवपदी होतो आणि आता पाच महिने बीसीसीआयच्या संयुक्त सचिवपदी आहे. प्रोग्रेस अँड युनिटी पॅनलचे प्रर्वतक गेली दोन दशके क्रिकेट क्षेत्रात आहेत. तरीही मी स्वतंत्र सहा उमेदवार उभे करू शकलो आणि त्यांनी चांगली मते मिळवली, यासाठी सर्व क्लबचे आभार. जेमतेम ७ ते ८ मतांनी आमच्या उमेदवारांचा पराभव झाला. आता निवडून आलेल्या पॅनलने सकारात्मक दृष्टीने क्रिकेट पुढे नेण्यावर भर द्यावा. तसेच स्टेडियम उभारून क्लबांचा विश्वास सार्थ करावा. - रोहन गावस देसाई, प्रवर्तक, परिवर्तन गट.