पणजी : मुख्यमंत्र्यांनी २४ तासांची मुदत दिली असली तरी खनिजवाहू ट्रकमालकांचा असहकार मागे घेण्यावर रविवार सायंकाळपर्यंत निर्णय झाला नव्हता. सोमवारी (आज) सकाळी १0 वाजता ट्रकमालकांची उसगाव येथे बैठक होत असून तेथे आंदोलनाबाबत फैसला होणार आहे. गावस म्हणाले की, सध्याचा ८ रुपये प्रतिटन वाहतूक दर मुळीच परवडणारा नाही. खाणी बंद झाल्या तेव्हा डिझेल ३९.६0 रुपये लिटर होते. आज डिझेलचा भाव ४८.१८ रुपये लिटरवर पोहचला आहे. त्यामुळे ट्रकमालकांना दर वाढवून मिळायलाच हवा. वरचे दहा रुपये प्रतिटन सरकारने सोसावेत आणि ट्रकमालकांना १८ रुपये प्रतिटन द्यावेत, अशी आमची मागणी आहे. सरकार खाण कंपन्यांसाठी निर्यातदर कमी करू शकते तर ट्रकमालकांसाठी १0 रुपये प्रतिटन का सोसू शकत नाही, असा सवाल त्यांनी केला. खाणबंदीच्या काळात सर्वात मोठी झळ ट्रकमालकांना पोचली. खाण कंपन्यांनी बक्कळ पैसा कमावलेला आहे; परंतु सरकारला ट्रकमालकांचे काहीच सोयरसुतक नसून खाण कंपन्यांचेच चोचले पुरविले जात आहेत, असा आरोप गावस यांनी केला. गावस पुढे म्हणाले की, सेसा गोवा कंपनीने आपला पिग आयर्न प्रकल्प बंद पडतो म्हणून खाणी सुरू करण्यासाठी कितीतरी वेळा सरकारला विनवणी केली. आता ६0 टक्के खनिजमाल या प्रकल्पासाठी जातो. निर्यातीचा प्रश्न नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज दर उतरल्याचा येथील व्यवहारावर कोणताही परिणाम होत नाही. याबाबतीत तरी ट्रकमालकांना खनिज वाहतुकीसाठी प्रतिटन १८ रुपये मिळायला हवेत. दरवाढीसाठी पुुकारलेल्या असहकार आंदोलनात तीन हजार ट्रकमालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)
आज होणार फैसला
By admin | Updated: December 14, 2015 01:13 IST