लोकमत न्यूज नेटवर्कडिचोली : कासारपाल येथे रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी लावलेल्या फासात एक बिबट्या अडकला व तडफडून मरण पावला. सोमवारी (दि. १५) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी, असा अंदाज वन खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. प्राणीमित्र अमृतसिंग, पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी याविषयी हळहळ व्यक्त केली आहे. वन विभागाचे मदत पथक वेळेवर न पोहोचल्यामुळे बिबट्या तडफडून मेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेबाबत अमृतसिंग यांनी राजेंद्र केरकर यांना माहिती दिल्यानंतर केरकर यांनी वन अधिकारी अजय सक्सेना, प्रदीप वेरेकर, विलास गावस यांना या घटनेविषयी कळविले. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी विलास गावस, सोमा परवार केरकर, जितेंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली.फासात अडकलेल्या बिबट्याने सुटकेसाठी बराच संघर्ष केल्याचे तेथे असलेल्या खुणांवरून दिसून येत आहे. विलास गावस व अन्य वन कर्मचाऱ्यांनी मिळून फास तोडला व मृत बिबट्याला बाहेर काढले, त्याची तपासणी केली. फास लागूनच बिबट्याला मरण आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. वन्यप्राणी शेतीची, बागायतीची नासधूस करतात. यासाठी असे फास लावण्यात येतात; पण या फासामुळे बिबट्याचा मात्र हकनाक बळी गेला. फास लागून वन्यप्राण्यांचा जीव जाण्याची ही तिसरी घटना असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. वन विभागाकडे यंत्रसामग्री, मनुष्यबळ, वाहन व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे मदत पथक वेळेवर घटनास्थळी पोहोचत नाही. यात वन अधिकारी, तसेच मुख्यमंत्री तथा वनमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तातडीने लक्ष घालून वन विभागाला सूचना करावी. जादा सोयी व वाहने पुरवावीत, अशी मागणी राजेंद्र केरकर यांनी केली आहे. मृत बिबट्याचा पंचनामा करून शवविच्छेदन केले असून वन अधिकारी अधिक तपास करीत आहेत. बिबट्याच्या मृत्यूची बातमी समजताच घटनास्थळी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
कासारपाल येथे बिबट्याचा मृत्यू
By admin | Updated: May 17, 2017 02:40 IST