पणजी : बांबोळी-दोनापावल रस्त्यावर शनिवारी रात्री अपघातात सापडलेल्या डेर्वीन ग्रासियसवर औषधोपचार झाले असते तर त्याचे प्राण वाचण्याची शक्यता होती; परंतु अधिक वेळ तो तेथे पडून राहिल्यामुळे रक्तस्राव होऊन तो प्राणाला मुकला. हा अपघात रात्री ९.३० च्या सुमारास झाला होता. बांबोळी ते दोनापावल रस्त्यावर आॅल इंडिया रेडिओ केंद्राजवळ झाला होता. दुचाकीवरील ताबा गेल्यामुळे हा अपघात घडला होता. त्यात डेर्वीन ज्योकीम ग्रासियस हा १७ वर्षांचा मुलगा जबर जखमी झाला. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरील वाहतूकही कमी असल्यामुळे आणि त्या बाजूने गेलेल्या एकाही वाहनचालकाच्या लक्षात येऊन त्यांनी त्याला इस्पितळात पोहोचवायची काळजी घेतली नसल्यामुळे बराच वेळ तो तेथे पडून राहिला, अशी माहिती आगशी पोलीस स्थानकातून देण्यात आली. या दुचाकीवर तिघेजण होते असे सांगितले जाते; परंतु आगशी पोलीस स्थानकातूून दिलेल्या माहितीनुसार त्यावर दोघेजण होते. डेर्वीनचा भाऊ मोटरसायकल चालवीत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. परंतु, तोही अल्पवयीन होता अशी माहिती देण्यात आली. ते चालवीत असलेली दुचाकी टीव्हीएस ज्युपीटर ही गिअरविरहित दुचाकी होती. त्यामुळे १६ वर्षे पूर्ण झालेल्यांना गिअरविरहित वाहने चालविण्याचा सशर्त परवाना दिला जातो. हा परवाना त्यांच्याकडे होता की नाही याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. डेर्वीन हा गोवा वेल्हा येथील असून त्याचे पालक विदेशात कामाला असतात. त्यामुळे ते आले नसल्यामुळे अजून त्याचा मृतदेह गोमेकॉत ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
अपघातानंतर उपचारास विलंबामुळे मृत्यू
By admin | Updated: March 23, 2015 02:07 IST