लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: प्रियोळ गावातील प्रसिद्ध माटोळीकार दत्ता शंभू नाईक यांना राज्य शासनाच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे आयोजिण्यात आलेल्या राज्यस्तरीय माटोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. नाईक यांनी या स्पर्धेत सातव्यांदा प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचा मान प्राप्त केला. यंदा त्यांनी गावशीकान्न श्री नवदुर्गा देवीच्या रूपांतल्या माटोळी साकारली होती.
यंदा दत्ता नाईक यांच्या विजयाची सप्तपदी झाली. गोवा फोरवर्ड पक्ष आयोजित 'आमचो गणपती, आमची माटोळी' स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी नावलौकिक मिळविले आहेत. गोव्यात आणि गोव्याबाहेर देखील त्यांच्या माटोळीला प्रसिद्धी मिळालेली आहे. पोलिस सेवेत कार्यरत असलेले नाईक हे शेतकरी आहेत.
रानावनात भटकून विविध फळे, वनस्पती आदींची ओळख करून घेऊन त्यांचा संग्रह करून ठेवणे हा त्यांचा चतुर्थी आधीचा नित्यक्रम आहे. विकासाच्या आड जंगले कापली जात आहेत आणि माणसांमध्ये असलेली पर्यावरणविषयची संवेदना हळूहळू कमी होत आहे. दुसऱ्या बाजूला कला आणि शेतीची आवड असलेले कलाकार नाईक यांच्यासारखी व्यक्ती पर्यावरणपूरक कलाकृती साकारून निसर्ग संवर्धनाचा आणि निसर्गाचे संगोपन करण्याचा संदेश देतात. दुर्मीळ तसेच औषधी वनस्पती आणि जंगली फळे यांचा शोध घेणे आणि स्वतःच्या निरीक्षणातून रानावनात जाऊन ती आणणे हे सगळे ते स्वतः करतात. त्यामुळे ते निसर्ग संपदेशी बऱ्यापैकी परिचित आहेत.
माटोळी ही सर्वसमावेशक आराधना
माटोळी ही सर्वसमावेशक आराधना असून, ते एक पूर्ण समर्पणाचे रूप आहे. आपण जे धरतीवर कष्ट करून उगवतो ते सिद्धिविनायकाला अर्पण करतो. म्हणजेच आपल्या मातीविषयी कृतज्ञ भावाची अभिव्यक्त होत असते. त्यातूनच चतुर्थीला भाताची कणसे हीदेखील देवाला अर्पण करण्याची प्रथा आपल्या गोमंतकात आहे. त्यामुळे याच कृतज्ञ भावनेने गणरायासमोर बांधलेली माटोळी गोव्यात कलात्मकतेने सजते, असे नाईक सांगतात.
राजस्तरावरील बक्षिसे
दत्ता नाईक यांना पहिल्यांदा २०१६ साली श्रीगणेशरूपी माटोळीला, दुसऱ्यांदा २०१७साली महादेवरूपी, तिसऱ्या वेळीस २०१९ साली बुद्धरूपी माटोळीला, चौथ्यांदा २०२२ साली संत गोरा कुंभाररूपी माटोळीला, पाचव्यांदा २०२३ मध्ये श्री देवी लड्राईरूपी माटोळीस, सहाव्या वेळी २०२४ मध्ये भगवान परशुरामरूपी माटोळीला आणि यंदाच्या वर्षी सातव्यांदा म्हणजेच २०२५च्या चतुर्थीला त्यांनी साकारलेल्या गावशीकान्न श्री नवदुर्गा देवीच्या रूपांतल्या माटोळीला प्रथम पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.