कोरगाव : पेडणे तालुक्यात अन्न सुरक्षा कार्डांबाबत बराच घोळ घातल्याचे दिसून येत आहे. समाज कल्याण खात्यातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्ड वाटपाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, या कार्डमध्ये अनेक चुका राहिल्याने नागरिकांत गोंधळ उडाला आहे. या कार्डांवर युनिक कार्ड नंबर असून पी.एच.एच. असा उल्लेख आहे. कार्डधारकांची नावे अगदीच सूक्ष्म अक्षरात लिहिलेली असून ती वाचण्यास बराच त्रास होत आहे. या नावांतही अनेक चुका असून पत्ता, गावांची नावे चुकलेली आहेत. जिथे पुरुष लिहायला पाहिजे तिथे महिला म्हणून लिहिलेलं आहे. बापाचं वय मुलाला लावलं, मुलाचं वय आजोबाला लावलंय अशा किती तरी चुका दिसून येत आहेत. अन्न सुरक्षा अर्ज भरून घेताना नाव, गाव, जन्म तारीख, पुरुष, महिला, त्यांचं मासिक उत्पन्न, बॅँकेचा खाते क्रमांक, कुठली बॅँक, गॅसबुकचा नंबर अशी सर्व माहिती लिहून घेतली होती. काही लोकांनी तर त्या अर्जाच्या मागे सर्व झेरॉक्स, रेशनकार्र्ड, आधारकार्ड, जन्माचा दाखला, बॅँक खात्याचे झेरॉक्स या सर्व गोष्टी लावल्या होत्या, असे असूनही अनेक चुका झाला आहेत. आता या चुका सुधारायच्या झाल्या तर कार्डधारकाला एक अर्ज करावा लागतो. पुरुष की महिला आहे त्याला जन्माचा दाखला लावावा लागतो. पत्ता चुकला असेल तर रेशनकार्ड, आधारकार्ड आणि घरपट्टी लावावी लागते. (प्रतिनिधी)
पेडणे तालुक्यातील अन्न सुरक्षा कार्डांत घोळ
By admin | Updated: November 11, 2015 00:58 IST