पणजी : तेरेखोल येथील गोल्फ कोर्स प्रकल्पासंबंधी लिडिंग हॉटेलला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने चपराक देताना वादग्रस्त दोन इमारती ७०० चौरस मीटर जागेच्या आतच बांधण्याचा आदेश दिला. त्यामुळे या प्रकल्पाला तात्पुरती वेसण घातली गेली आहे. लिडिंग हॉटेलने गोल्फ प्रकल्पाच्या अंतर्गत ४० हजार चौरस मीटर जागेत इमारती उभारण्याचे नियोजन होते. कंपनीने खंडपीठाला सादर केलेल्या प्रकल्पाच्या अराखड्यात त्याची माहिती होती; परंतु गोवा फाउंडेशनने त्याला हरकत घेतली होती. या प्रकल्पासाठी देण्यात आलेली परवानगी बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. याचिकादारातर्फे अॅड. नॉर्मा अल्वारिस यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व नगर नियोजन खात्याकडून कायदे व नियम धाब्यावर बसवून प्रकल्पाला परवानगी देण्यात आल्याचा दावा केला होता. दोन्ही खात्यांकडून याबाबतीत ठेवण्यात आलेल्या त्रुटीही खंडपीठाच्या नजरेस आणून दिल्या होत्या. प्रकल्पाला परवानगी दिल्यास राज्य या गावातील सर्व कूळ जमीन (शेतजमीन) गमावून बसणार असल्याचा दावा केला होता. लिडिंग हॉटेलतर्फे प्रतिवाद करताना प्रकल्पाचे बांधकाम हे शेतजमिनीत नसल्याचे म्हटले होते. (प्रतिनिधी)
लिडिंग हॉटेल प्रकल्पाला न्यायालयाची चपराक
By admin | Updated: July 30, 2015 02:12 IST