पणजी : एका बाजूने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी पणजी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या कामात स्वत:ला जोडून घेऊ पाहत असताना दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्ष संघटनेशी काँग्रेसच्या आमदारांनी सवतासुभा मांडला आहे. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक चेल्लाकुमार यांच्याशी आमदार बाबूश मोन्सेरात व विश्वजित राणे यांचा टोकाचा संघर्ष सुरू असून याचाच परिणाम म्हणून या दोघा आमदारांसह अन्य काहीजण पक्षाने शुक्रवारी बोलविलेल्या बैठकीवरही बहिष्कार टाकणार आहेत. चेल्लाकुमार हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. पणजीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे कोणते आमदार, कोणते पदाधिकारी व कार्यकर्ते आणि एकूणच पक्ष संघटना किती काम करत आहे, यावर चेल्लाकुमार हे लक्ष ठेवून आहेत. गेल्या आठवड्यातही पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी चेल्लाकुमार यांना गोव्यात पाठविले होते. त्या वेळी बाबूश मोन्सेरात व विश्वजित राणे या दोघा आमदारांना बोलावून घेऊन चेल्लाकुमार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. मोन्सेरात यांनी आपण पणजीचे काँग्रेस उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांच्यासाठी काम करणार नाही, उलट त्यांचा पराभव व्हावा म्हणून आपण वावरेन, असे चेल्लाकुमार यांना स्पष्टपणे सांगितले. विश्वजित यांना चेल्लाकुमार यांनी सत्तरी तालुक्याबाहेर जाऊन काँग्रेसचे काम करा, असा सल्ला दिला. तसेच पक्षाच्या वाढीसाठी तुम्ही आणखी वेळ द्या, असाही सल्ला दिला व काही आक्षेपार्ह प्रश्नही केले. त्यामुळे विश्वजित नाराज झाले. त्यांनी आपण काँग्रेस पक्षाच्या बैठकांमध्ये भागच घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याची कल्पना आता चेल्लाकुमार यांना आली आहे. काँग्रेसचे कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर हे सोमवारीच विदेश दौऱ्यावरून परतले आहेत. गेल्या दोन दिवसांत मडकईकर हेही चेल्लाकुमार यांना भेटले नाहीत. मात्र, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत ते भाग घेण्याची शक्यता आहे. सकाळी अकरा वाजता काँग्रेसची कार्यकारिणी व आमदार यांची ही संयुक्त बैठक तातडीने बोलविण्यात आली आहे. (खास प्रतिनिधी)
काँग्रेस आमदारांचे निरीक्षकांना आव्हान
By admin | Updated: January 30, 2015 01:26 IST