पणजी : गोवा विद्यापीठाने २००८ साली एका खासगी कंपनीमार्फत क्लिनिकल रिसर्च अॅण्ड क्लिनिकल डेटा मॅनेजमेन्ट (सीआरसीडीएम) अभ्यासक्रम सुरू केला होता. त्या वेळी गैरव्यवहार झाल्याचे गोवा विद्यापीठाच्या चौकशी समितीने कबूल केले असून याप्रकरणी सखोल आॅडिट करून घेण्याचे विद्यापीठाच्या कार्र्यकारी मंडळाने ठरविले आहे. कार्र्यकारी मंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार विद्यापीठाच्या कुलसचिवांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. डॉ. दिलीप देवबागकर हे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी असताना २००८ साली सीआरसीडीएम हा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. यासाठी एका कंपनीची नियुक्ती केली गेली व त्या कंपनीने प्रत्येकी साठ हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे शुल्क विद्यार्थ्यांकडून गोळा केले. मात्र, कंपनी नियुक्त करण्यापूर्वी इच्छा प्रस्ताव मागितले गेले नाहीत. शिवाय विद्यापीठाचे जे नियम व अटी आहेत त्यांचे पालन केले गेले नाही. प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाला. परिणामी, २०११ साली हा अभ्यासक्रम बंदही करण्यात आला. या अभ्यासक्रमासाठी कंपनी कोणत्या निकषांवर निवडली गेली ते स्पष्ट नाही. शिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देताना विद्यापीठाच्या परीक्षा विभागास कल्पना देण्यात आली नाही. कंपनीने बाहेर प्रमाणपत्रे छापून घेतली व ती विद्यार्थ्यांना दिली. गोवा विद्यापीठाला प्रतिष्ठा असून अशा प्रकारच्या गैरव्यवहाराची गोवा विद्यापीठात कधीच पुनरावृत्ती होऊ नये, असे कार्यकारी मंडळाने म्हटले आहे. तसेच हा विषय पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे असल्याने डिलिमा समितीचा अहवालही त्या विभागाकडे सोपविण्यात आला आहे. (खास प्रतिनिधी)
विद्यापीठाकडून घोटाळ्याची कबुली
By admin | Updated: December 25, 2015 02:05 IST