पणजी : आल्तिनो-पणजी येथील एका महाविद्यालयाच्या आवारात तलवार हल्ल्याचा प्रकार घडला; परंतु हातावर वार झाल्यामुळे केवळ किरकोळ जखम होण्यापुरते प्रकरण निभावले. ज्याच्यावर तलवारीचा वार झाला त्या विद्यार्थ्याचे नाव गोविंद कुंडगी असे असून त्याने पणजी पोलिसांत तक्रार दिली आहे. आकाश कळंगुटकर या विद्यार्थ्याने आपल्यावर जिवघेणा हल्ला केला. आपल्या मानेवर त्याने तलवारीचा वार केला; परंतु तो आपण चुकविल्यामुळे हाताला लागला, असे त्याने तक्रारीत म्हटले आहे. मोटरसायकलवरून जाताना पाठीमागून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रार करणारा कुंडगी याने मिरामार येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचे पोलिसांना सांगितले. मिरामार येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी आल्तिनो येथील महाविद्यालयाजवळ कशाला आला होता, या प्रश्नाचे उत्तरही तो व्यवस्थित देऊ शकला नाही. कळंगुटकरचा पोलीस शोध घेत आहेत. आठ दिवसांपूर्वी या महाविद्यालयाच्या आवारात भांडण झाले होते. या भांडणात कळंगुटकर याच्यावर हल्ला केला होता. महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून पणजी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही नोंद केली होती. त्यामुळेच आजची भांडणे झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)
महाविद्यालयाच्या आवारात
By admin | Updated: August 22, 2014 01:29 IST