लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, गुरुवारी आपल्या वाढदिनी विविध मंदिरांना भेट देऊन देवी-देवतांचे आशीर्वाद घेतले. तसेच त्यांनी गोमंतकीय जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी व आरोग्यासाठी प्रार्थना केली.
साखळी भाजपतर्फे रवींद्र भवनमध्ये आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिराला मुख्यमंत्री सावंत यांनी भेट दिली व शिबिरात उपस्थित असलेल्या लोकांची विचारपूसही केली. या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले. तसेच पुष्पगुच्छ व केक न आणण्याचे आवाहन केले. मात्र तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच अनेक गोमंतकीयांनी मुख्यमंत्र्यांच्या साखळी येथील निवासस्थानी गर्दी केली होती. अनेकांनी केक, पुष्पगुच्छ आणले होते. मात्र ते स्वीकारण्यास नकार देत मुख्यमंत्र्यांनी केवळ हस्तांदोलन करून शुभेच्छा स्वीकारल्या.
आरोग्य जपा...
प्रत्येकाने आपले आरोग्य चांगले ठेवावे. आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली असून आपण निरोगी असलो तरच जीवन समृद्ध होणे शक्य आहे. सर्वांना परमेश्वराच्या कृपेने आयुष्य आरोग्यदायी लाभावे, हेच वाढदिनी देवाला साकडे घातल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.