पणजी : लुईस बर्जर प्रकरणात आरोपी चर्चिल आलेमाव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून निवाडा सोमवारी होणार आहे. चर्चिल यांचा हा सलग चौथा जामीन अर्ज आहे. लुईस बर्जर प्रकरणात क्राईम ब्रँचकडून आरोपपत्र सादर केल्यानंतर बदलत्या परिस्थितीचा फायदा घेऊन विशेष न्यायालयात पुन्हा जामिनासाठी अर्ज केला होता. यापूर्वी दोनवेळा अर्ज फेटाळल्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेतलेले चर्चिल यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. चर्चिलचे वकील अरुण ब्राज डिसा यांनी युक्तिवाद करताना क्राईम ब्रँचने चर्चिल यांना विनाकारण अडकविण्याचे प्रयत्न केल्याचे म्हटले होते. त्यांच्याविरुद्ध लाचखोरीचे कोणतेही पुरावे क्राईम ब्रँचकडे नाहीत, असाही दावा केला होता. जामिनाला विरोध करताना क्राईम ब्रँचचे वकील राजीव गोम्स यांनी चर्चिलची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी लुईस बर्जर कंपनीला जैका प्रकल्पाचे सल्लागार म्हणून कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचे सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध असल्याचे म्हटले होते. पणजी प्रथमवर्ग न्यायाधीशापुढे नोंदविलेल्या कबुली जबाबाचाही त्यांनी उल्लेख केला होता. (प्रतिनिधी)
चर्चिलचा फैसला सोमवारी
By admin | Updated: October 8, 2015 01:43 IST